राखी बांधण्याआधीच काळाचा घाला; बोलेरोच्या धडकेत बहीण अन् चिमुकलीचा अंत! भाऊ-भाचा गंभीर; संतप्त ग्रामस्थांनी वाहन पेटवले!

जळगाव जामोद ()
रक्षाबंधनाचा सण आनंदात साजरा करण्यासाठी बहिणीला माहेरी घेऊन निघालेल्या भावाच्या नशिबी नियतीने अकल्पित दुःख लिहिले! रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला भरधाव बोलेरोने जोरदार धडक दिल्याने एक वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या गंभीर जखमी आईने उपचारासाठी नेताना वाटेतच प्राण सोडले. या भीषण अपघातात भाऊ आणि भाचा गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.
ही काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना टुणकी-लाडनापूर रस्त्यावरील ओम डेअरीजवळ शुक्रवारी दुपारी सुमारे चार वाजता घडली.
प्राप्त माहितीनुसार, बोरवा, ता. तेल्हारा, जि. अकोला येथील कमलेश भुरेलाल चंगळ (वय ३२) हे रक्षाबंधनानिमित्त मध्य प्रदेशातील जसवंती येथील बहीण सपना संजय वासकेला आणि तिच्या दोन मुलांना घेऊन घरी जात होते. रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून ते उभे असतानाच जामोदच्या दिशेने येणाऱ्या एमपी १२ झेडएच ९३४२ क्रमांकाच्या बोलेरोने त्यांना जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येते.
धडकेची तीव्रता एवढी भीषण होती की, एक वर्षीय उमी संजय वासकेला हिचा जागीच मृत्यू झाला. तिची आई सपना गंभीर जखमी झाली होती; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. कमलेश चंगळ आणि त्यांचा भाचा गंभीर जखमी असून त्यांना अकोला येथे हलविण्यात आले.
अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी बोलेरो पेटवून दिल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. बहिणीच्या हातून राखी बांधून घेण्याआधीच भाऊ आपल्या बहिणीला आणि चिमुकल्या भाचीला कायमचा मुकला! आनंदाचा रक्षाबंधन सण क्षणात शोकसागरात बुडाल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.



