म्हाताऱ्यांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”; अण्णा हजारेंवर अभिजीत दीपके यांची वादग्रस्त टीका

“म्हाताऱ्यांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”; अण्णा हजारेंवर अभिजीत दीपके यांची वादग्रस्त टीका
अण्णा हजारेंचं नाव घेताच अभिजीत दीपके यांचा निशाणा; “तरुणांच्या भविष्याचे निर्णय आम्हीच घेऊ”
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थी आणि तरुणांच्या भविष्याबाबत वयोवृद्धांनी निर्णय घेऊ नयेत, त्यांनी सामाजिक-राजकीय जीवनातून निवृत्त होऊन आश्रमात बसावे, असे वक्तव्य दीपके यांनी पत्रकार परिषदेत केले.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांनी “तुम्ही अण्णा हजारे यांची भेट घेणार का?” असा प्रश्न विचारला असता, दीपके यांनी आपण अण्णा हजारे किंवा अन्य कोणत्याही नेत्याची भेट घेणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी वयोवृद्ध नेतृत्वावर टीका करत, “ज्यांचे वय ५० ते ६० वर्षांपेक्षा अधिक झाले आहे त्यांनी सामाजिक आणि राजकीय चळवळींमधून स्वेच्छेने बाजूला व्हावे. हा देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असून, आमचं भविष्य कसं घडवायचं हे आम्हीच ठरवू,” असे मत व्यक्त केले.
दीपके यांच्या या विधानानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अण्णा हजारे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर विविध संघटना आणि राजकीय पक्ष काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नावामागील पार्श्वभूमीही चर्चेत आहे. बेरोजगार तरुणांबाबत करण्यात आलेल्या एका उपरोधिक टिप्पणीच्या निषेधार्थ सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे डिजिटल हँडल सुरू करण्यात आले होते. बेरोजगारीच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात तरुणांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर या उपक्रमाने पुढे सामाजिक आणि राजकीय चळवळीचे स्वरूप धारण केल्याचा दावा करण्यात येत आहे.



