प्रॉपर्टी धारकांना ‘पीआर कार्ड’ त्वरित वाटप करा, अन्यथा भूमी अभिलेख कार्यालयाला ठोकणार टाळे; राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) इशारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा:शहरातील प्रॉपर्टी धारकांना त्यांचे हक्काचे ‘पीआर कार्ड’ (मालमत्ता पत्रक) त्वरित वाटप करण्यात यावे, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकू आणि तीव्र आंदोलन छेडू, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे. यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना एक निवेदन सादर केले आहे.
नागरिकांची अडवणूक आणि संताप
राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भूमी अभिलेख विभागाच्या वतीने देऊळगाव राजा शहरात आणि तालुक्यात मालमत्तांचे सर्वेक्षण तसेच संबंधित सर्व प्रशासकीय प्रक्रिया आधीच पूर्ण करण्यात आली आहे. असे असतानाही, नागरिकांना त्यांचे हक्काचे ‘पीआर कार्ड’ मिळण्यात प्रचंड विलंब होत आहे. शासकीय प्रक्रियेच्या नावाखाली सर्वसामान्यांची नाहक अडवणूक केली जात असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
आंदोलनाचा दिला इशारा
पीआर कार्ड वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांना घरगुती कर्ज, मालमत्तेची खरेदी-विक्री आणि इतर कायदेशीर कामांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ यावर तोडगा काढून पीआर कार्डचे वाटप सुरू करावे. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) स्टाईलने भूमी अभिलेख कार्यालयाला कुलूप ठोकून प्रशासनाचा निषेध करेल, असा सज्जड दम या निवेदनातून देण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश इंगळे, नगर सेवक ऍड. रामेश्वर रामाणे, शिवाजी मेहेत्रे, गणेश सवडे, शराध्यक्ष विष्णू रामाणे, शरद डोईफोडे आदींनी दिला आहे.



