मुक्ताईनगर – जीवघेण्या खड्ड्याचा नागरिकांना दररोज सामना

मुक्ताईनगर शहरातील भुसावळ रोडवर हॉटेल मुक्ताई पॅलेस समोरील मोठा खड्डा नागरिकांच्या जीवाला धोका ठरत आहे. रस्त्यावरील या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्याने तो पूर्णपणे अदृश्य होतो आणि दुचाकीस्वार तसेच छोटे वाहनधारक थेट अपघाताला सामोरे जातात. पाऊस नसतानाही या खड्ड्यातून वाहन नेणे म्हणजे जीव मुठीत धरून जाण्यासारखे झाले आहे. दररोज लहानमोठे अपघात घडत असून नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे.
स्थानिक नागरिकांचा रोष इतका वाढला आहे की, “मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? की त्याआधीच उपाययोजना होणार?” असा ज्वलंत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर हा खड्डा तातडीने बुजविण्यात आला नाही तर परिसरात तीव्र आंदोलन करण्यात येईल. प्रशासन व संबंधित विभागाने नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचविणाऱ्या या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे.



