जे. ई. स्कूल आणि जुनियर कॉलेज -‘मराठी अभिजात भाषा दिवस’ उत्साहात साजरा..

मुक्ताईनगर:
येथील जे. ई. स्कूल आणि जुनियर कॉलेज मध्ये ३ ऑक्टोबर रोजी ‘मराठी अभिजात भाषा दिवस’ अत्यंत उत्साहात आणि मराठी भाषेच्या अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ ऐतिहासिक दर्जा दिल्याबद्दल विद्यालयात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत विद्यालयात ‘अभिजात भाषा सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विषय समिती प्रमुख एस. आर. ठाकूर यांनी केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती माता यांच्या मूर्तीपूजनाने झाली. मराठी भाषेला लाभलेली २००० ते २५०० वर्षांपूर्वीची समृद्ध साहित्य व ग्रंथ परंपरा अधोरेखित करण्यासाठी रामायण, श्रीमद्भगवद्गीता, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी आणि संत तुकाराम गाथा यांसारख्या महान आणि पवित्र ग्रंथांचे सामूहिक पूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजक एस. आर. ठाकूर यांनी मराठी भाषेचा गौरवशाली प्राचीन इतिहास, तिची माहिती आणि या भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळण्यामागचे निकष याविषयी अत्यंत सविस्तर मार्गदर्शन केले. मराठी ही केवळ आजची भाषा नसून तिला २५०० वर्षांहून अधिक जुना इतिहास आहे,हे त्यांनी विविध पुराव्यांसह स्पष्ट केले.
मराठी भाषेचे श्रेष्ठत्व सांगताना महाराष्ट्रातील महान साहित्यिकांच्या ग्रंथांचे दाखले दिले. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील
“माझा मराठाचि बोलू कौतुके।
परी अमृतातेही पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन॥”
या अजरामर ओळींचा उल्लेख करत मराठीच्या अमृताहूनही गोड असणाऱ्या स्वरूपाचे दर्शन घडवले. तसेच श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी,संत तुकारामांचे अभंग,महानुभाव पंथाचे ‘लीळाचरित्र’ हे मराठीचे प्राचीन वैभव कसे टिकवून आहेत, हे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले.आधुनिक मराठीतील काही प्रसिद्ध चारोळ्या आणि सुश्राव्य काव्यांचे सुंदर सादरीकरण करत विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या गोडव्याची अनुभूती दिली.या कार्यक्रमाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश स्पष्ट करत नवीन पिढीने या भाषेचा वारसा पुढे चालवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष
विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम.चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यांचे मानवी जीवनातील व साहित्यातील महत्त्व स्पष्ट केले.आपली बोलीभाषा ही संस्कृतीची जननी आहे, तर अधिकृत व्यवहारासाठी प्रमाण भाषा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये पेपर लेखनात ‘प्रमाण भाषेचा’ आवर्जून वापर करावा,असे मत त्यांनी मांडले.सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मराठी अभिजात भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
मराठी भाषेचा प्रचार आणि विद्यार्थ्यांमध्ये भाषेची आवड निर्माण करण्यासाठी ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान ‘अभिजात भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहा अंतर्गत विद्यालयात साहित्यिक व कवींच्या मुलाखती, काव्यवाचन स्पर्धा आणि प्रकट वाचन स्पर्धा अशा विविध भरगच्च उपक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सांगता मराठी विषय समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या सामूहिक पसायदान वाचनाने झाली. जागतिक कल्याणाची भावना असणारे पसायदान सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी अत्यंत भक्तीभावाने एका सुरात म्हटले.
या मंगल प्रसंगी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.



