मुक्ताईनगरात ठाकरे शिवसेनेची संघटनात्मक मोर्चेबांधणी; निष्ठावंत शिवसैनिकांशी संवादावर भर

मुक्ताईनगरात ठाकरे शिवसेनेची संघटनात्मक मोर्चेबांधणी; निष्ठावंत शिवसैनिकांशी संवादावर भर
मुक्ताईनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे व युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते मा. आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला वेग देण्यासाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. रावेर लोकसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख तथा शिवसेना उपनेते मा. गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
बैठकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासोबतच बूथ लेव्हल एजंट (BLA) नियुक्ती, रिक्त पदांवर पदाधिकारी नियुक्त करणे, तसेच निष्ठावंत शिवसैनिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना मा. गुलाबराव वाघ यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. “आपल्याला कोणाचे नाव घेऊन राजकारण करायचे नाही, कोणावर बोलायचे नाही. कोण काय करतेय, याच्याशी आपल्याला काहीही देणेघेणे नाही. आपल्याला आपले पक्ष संघटन मजबूत करायचे आहे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांना दिला.
राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांपेक्षा संघटनात्मक ताकद वाढविणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद ठेवणे आणि तळागाळातील शिवसैनिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, हीच पक्षवाढीची दिशा असली पाहिजे, असेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले. पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नेतृत्व शिवसैनिकांच्या पाठीशी सदैव उभे असल्याचा विश्वासही मा. वाघ यांनी व्यक्त केला.
जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि विद्यमान संचालक मा. योगिराज दादा पाटील यांनीही संघटनात्मक कामकाजाला अधिक गती देण्याची भूमिका मांडली. आगामी काळात बूथनिहाय संघटन मजबूत करून पक्षाचा विचार घराघरात पोहोचविण्याचे आव्हान शिवसैनिकांसमोर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, बैठकीत काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. विधी व न्याय विभाग मुक्ताईनगर तालुकाप्रमुखपदी मा. ॲड. अशोक बोदडे, मुक्ताईनगर शहरप्रमुखपदी मा. मुकेश कदम, मुक्ताईनगर तालुका सचिवपदी मा. सुरज तळेकर, उपतालुकाप्रमुखपदी मा. समाधान भाऊ भोलाने, मा. निवृत्ती भाऊ चिखलकर आणि मा. ऋषिकेश भाऊ मराठे यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मा. गुलाबराव वाघ, मा. योगिराज दादा पाटील आणि महिला आघाडी जिल्हाप्रमुख मा. प्रतिभाताई जगदाळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या बैठकीस मा. गुलाबराव वाघ, मा. योगिराज दादा पाटील, उपजिल्हासंघटक मा. अशोक दादा शिंदे, मलकापूर विधानसभा संपर्कप्रमुख मा. ललितजी मुथा, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मा. प्रतिभाताई जगदाळे, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रप्रमुख मा. नितीन भाऊ गोसावी, तालुकाप्रमुख मा. ॲड. राहुल भाऊ पाटील, तालुका समन्वयक मा. ॲड. देवेंद्र बोदडे, बोदवड तालुकाप्रमुख मा. उपेंद्र भाऊ इंगळे, तालुका संघटक मा. डॉ. सुनील देवरे, मा. अक्षय पालवे, मा. रुपेश पाटील, संदिप डांगे, सद्दाम शाह, तालुका सोशल मीडिया (डिजी) समन्वयक मा. ॲड. अशोक दादा बोदडे, रावेर लोकसभा क्षेत्र सोशल मीडिया (डिजी) समन्वयक मा. जयवंत प्रभाकर चौधरी (राजपूत) यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी झालेली ही बैठक आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात असून, नेत्यांवरील टीका किंवा विरोधकांच्या राजकारणापेक्षा तळागाळातील संघटन मजबूत करण्याचा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे.
















