चिनावलमध्ये अंधश्रद्धेकडून धम्माकडे! भालेराव कुटुंबाचा ऐतिहासिक निर्णय;

- घरातील देवारा विसर्जित करून १४,५०० रुपयांचे दान विहाराला सुपूर्द
दै निक आवाज न्यायाचा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
विनोद तायडे
चिनावल ( ता रावेर )
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून समाजात प्रबोधनाची नवी दिशा देणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक घटना रावेर तालुक्यातील चिनावल नगरीत घडली आहे. येथील समाजसेवक श्री. संजय मधुकर भालेराव यांच्या कुटुंबाने वर्षानुवर्षे चालत आलेली ‘मुंजे’ बसवण्याची कर्मकांडाची परंपरा कायमची बंद करत, घरातील देव्हारा पूजनीय भदंत नागवंश महाथेरो यांच्या स्वाधीन केला.
भालेराव कुटुंबात २०१० पासूनच संजय भालेराव व त्यांच्या पत्नी सौ. ज्योती भालेराव यांनी अशा रूढी-परंपरांना विरोध दर्शवला होता. मात्र, आई-वडिलांच्या आग्रहास्तव ही प्रथा सुरू होती. २०२२ मध्ये चिनावल येथे संजय भालेराव यांच्या पुढाकाराने व समाजाच्या सहकार्याने भव्य बुद्ध विहार उभारल्यानंतर पूज्य.भदंत नागवंश महाथेरो (नागपूर) यांच्या उपस्थितीत पहिला वर्षावास संपन्न झाला. या वर्षावासाच्या माध्यमातून संपूर्ण चिनावल नगरीत व भालेराव कुटुंबात धम्ममय वातावरण निर्माण झाले
लहान बंधू संतोष भालेराव यांच्या पत्नी सौ. मीनाताई भालेराव यांनी देव-देवतांच्या संकल्पना आणि उपवास सोडून स्वतःला पूर्णपणे धम्मकार्यात झोकून दिले.
शुक्रवार, दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी लहान बंधू संतोष भालेराव यांच्या घरी आयोजित ‘परित्राण पाठ’ कार्यक्रमादरम्यान, संजय भालेराव यांच्या विनंतीला मान देत वडील श्री. मधुकर काशीराम भालेराव व आई सौ. सुपडाबाई भालेराव यांनी विचारपूर्वक घरातील ‘मुंजे’ यांचा देवारा भंतेजींच्या स्वाधीन केला
भंतेजींच्या सूचनेनुसार, शनिवार दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी सौ. ज्योती भालेराव व सौ. सारिका भालेराव यांनी हे दागिने सोनाराकडे मोडून आलेली १४,५०० रुपयांची संपूर्ण रक्कम बुद्ध विहाराच्या निर्मिती व धम्मकार्यासाठी दान केली.
या क्रांतिकारी निर्णयाबद्दल बुद्ध विहारामध्ये संपूर्ण भालेराव कुटुंबाचे पुष्पगुच्छ देऊन अत्यंत उत्साहात स्वागत व अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी पूजनीय भदंत नागवंश महाथेरो यांनी संपूर्ण कुटुंबाचे मनापासून कौतुक करत त्यांना पंचशील दिले.
धम्मदेसना देताना भंतेजी म्हणाले,
”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज हाच आहे, जो अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरांचा त्याग करून बुद्ध धम्माच्या प्रज्ञेच्या आणि विज्ञानाच्या मार्गावर चालतो. भालेराव कुटुंबाने घेतलेला हा निर्णय समाजासाठी मार्गदर्शक ठरला.
या ऐतिहासिक निर्णयाचा प्रभाव शेजारीही तात्काळ दिसून आला. शेजारी राहणाऱ्या वहिनी सौ. कमलाबाई भालेराव यांनीसुद्धा प्रेरणा घेत आपल्या घरातील देव काढून भंतेजींच्या स्वाधीन केले आणि त्याचीही मोड विहाराला दान केली.
”आमच्या पंचक्रोशीमध्ये असे परिवर्तन पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. हा एक ऐतिहासिक क्षण असून याची सुरुवात आमच्या चिनावल नगरीतून झाली आहे. याचे संपूर्ण श्रेय पूजनीय भदंत नागवंश महाथेरो यांनाच जाते
कारण त्यांच्या वर्षावासामुळेच आमचा परिसर धम्ममय झाला आहे. आज खऱ्या अर्थाने आम्ही बौद्ध झाल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
चिनावल आणि संपूर्ण रावेर तालुक्यात भालेराव कुटुंबाच्या या धाडसी आणि प्रबोधनात्मक निर्णयाचे सर्वत्र जोरदार कौतुक होत असून, बाबासाहेबांच्या संस्कारांची ही लाट आता सर्वत्र पसरत आहे



