जळगावा जिल्हामहाराष्ट्र

पुण्याच्या भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यूज वृत्तसेवा । पुण्याच्या भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेले अजामीनपात्र वॉरंट अखेर रद्द करण्यात आल्याने खडसे यांच्यावरील अटकेची टांगती तलवार तूर्तास दूर झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी मुंबईतील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात सुरू आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीला एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे गैरहजर राहिल्याने न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली होती. वारंवार गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत खडसे दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

आज झालेल्या सुनावणीदरम्यान खडसे यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, प्रकृतीच्या कारणास्तव तसेच काही अपरिहार्य कारणांमुळे एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे मागील सुनावणीला उपस्थित राहू शकले नाहीत. न्यायालयाने ही बाब लक्षात घेत खडसे यांचे म्हणणे ऐकून घेतले.

भविष्यात प्रत्येक सुनावणीला नियमित हजर राहण्याच्या अटीवर न्यायालयाने एकनाथ खडसे यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या अडचणी तात्पुरत्या स्वरूपात कमी झाल्या आहेत.

या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यावर २०१६ मध्ये महसूल मंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीची जमीन सुमारे ३.७५ कोटी रुपयांना त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे खरेदी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तपास यंत्रणांच्या मते या जमिनीची बाजारभावानुसार किंमत सुमारे ४० कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील आरोप निश्चितीची प्रक्रिया आता वेग घेणार असून पुढील सुनावणीच्या तारखेला सर्व आरोपींना न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भात एकनाथ खडसे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता, “पुढील तारखेपर्यंत मी कोणत्याही न्यूज चॅनलशी बोलू शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button