श्री क्षेत्र चांगदेव येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची सदिच्छा भेट; शेतकऱ्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या

मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. रोहन घुगे यांनी आज पवित्र श्री क्षेत्र चांगदेव येथे सदिच्छा भेट देत संत चांगदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी संत चांगदेव महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर परिसराची पाहणी केली.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या विविध अडचणी व समस्या आत्मीयतेने जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
तसेच तापी-पूर्णा संगम परिसरातील पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असलेल्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळाची पाहणी करून तेथील विकासकामांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतला. सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, परिसरातील आवश्यक सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाबींची त्यांनी माहिती घेतली.
श्री क्षेत्र चांगदेव हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले तीर्थक्षेत्र असून तापी-पूर्णा संगमामुळे या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या परिसरातील मूलभूत सुविधा, तीर्थक्षेत्र विकास आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
या दौऱ्यावेळी भुसावळचे प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील, मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीष वखारे, चांगदेवचे सरपंच निखिल बोदडे, तलाठी नीरज पाटील, पंकज कोळी, अंकुश चौधरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रत्यक्ष भेटीमुळे चांगदेव क्षेत्राच्या विकासकामांना तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांच्या प्रशासकीय पाठपुराव्याला गती मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
स्थळ : श्री क्षेत्र चांगदेव, तापी-पूर्णा संगम



