जालन्यातील तरुणांनी दाखवले माणुसकीचे दर्शन; SMAग्रस्त गार्गीसाठी मदत

स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस
जालना प्रतिनिधी:
जालना बसस्थानक परिसरातील प्रवासी रिक्षाचालकांनी स्थानिक तरुणांच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकी जपत पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले. SMA (Spinal Muscular Atrophy) या गंभीर आजाराने ग्रस्त हृदया या चिमुकल्याच्या उपचारासाठी स्थानिक नागरिकांकडून आर्थिक मदत गोळा करण्यात आली होती. मात्र, हृदयाच्या उपचारासाठी आवश्यक असलेली मदत पूर्ण झाल्याने जमा झालेली रक्कम दुसऱ्या SMAग्रस्त चिमुकलीच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या मदत संकलन उपक्रमात तरुणांनी हिरीरीने सहभाग नोंदवला, सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश इंगोले पाटील, महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे OBC सरचिटणीस ज्ञानेश्वर बांगर, रीलस्टार विशाल राऊत तसेच सहकारी मित्र परिवाराने विशेष पुढाकार घेतला. त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करून गरजू रुग्णांच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन केले. नागरिकांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आपापल्या परीने आर्थिक मदत केली.
यातून जमा झालेली मदत SMA आजाराने ग्रस्त असलेल्या गार्गीच्या उपचारासाठी देण्यात आली. गरजू रुग्णाच्या उपचारासाठी नागरिकांनी दिलेली मदत योग्य ठिकाणी पोहोचावी आणि तिचा उपयोग उपचारासाठी व्हावा, या भावनेतून हा निर्णय घेण्यात आला. जमा झालेली मदत या युवकांनी रविराज साबळे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.
जालना बसस्थानकातील रिक्षाचालकांनी केलेल्या आवाहनाला शहरातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत हृदयाला मदतीचा हात दिला होता. नागरिकांनी दिलेल्या या योगदानामुळे हृदयासाठी आवश्यक निधी जमा झाला. त्यानंतर जमा झालेली रक्कम वाया जाऊ न देता ती गार्गीच्या उपचारासाठी देण्यात आली.
‘मदतीचा उद्देश एका गरजू जीवाला उपचार मिळवून देणे हा आहे. हृदयासाठी आवश्यक मदत पूर्ण झाल्यानंतर हीच मदत गार्गीच्या उपचारासाठी उपयोगी पडावी, हीच आमची भावना आहे,’ अशी भावना रिक्षाचालक व मदत उपक्रमातील सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
रिक्षाचालक, स्थानिक नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या या निर्णयाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, जालना शहरातील नागरिकांनी दाखविलेली सामाजिक संवेदनशीलता आणि सर्वांनी एकत्र येऊन घेतलेला पुढाकार माणुसकीचा आदर्श ठरत आहे.



