पावसाळी रानभाज्या बाजारात ;निसर्गाचे दान,आरोग्यास वरदान!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :गजानन तांगडे खामगांव
खामगांव तालुक्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावताच डोंगररांगा आणि शेताच्या बांधावर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्यांची रेलचेल वाढली आहे. कुठल्याही रासायनिक खताविना औषधांशिवाय पूर्णपणे नैसर्गिक रित्या उगविणाऱ्या या रानभाज्या खाण्याकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. स्थानिक बाजारात या रानभाज्यांना मोठी मागणी असून, आरोग्यवर्धक असलेल्या या भाज्या खरेदी करण्यासाठी खाणाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे.
चवीला उत्कृष्ट आरोग्यासाठी गुणकारी रानभाज्या केवळ चवीला च स्वादिष्ट नसतात, तर त्या औषधांनी समृद्ध असतात, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम व गुणकारी मानल्या जातात. बुलढाणा जिल्ह्यच्या विविध भागात पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या मिळतात. प्रामुख्याने करुटले, (कंठुळे )आकुची भाजी,तांदूळजा,अळूची पाने,कुड्याची फुले,आणि भारंगी यासारख्या रान भाज्या बाजारात उपलब्ध होत आहे. त्यामुळे या रानभाज्याना बाजारात चांगली मागणी असुन योग्य भाव मिळत आहे.पावसाळ्याच्या या दोन महिन्यात ग्रामीण भागातील महिला आणि आदिवासी बांधवाना हक्काचा रोजगार मिळतो. सकाळी शेतातून किंवा जंगलातून रानभाज्या गोळा करून त्या स्थानिक बाजारात विकल्या जातात. यामुळे ग्रामीण कुटुंबांना चांगला आर्थिक आधार, मिळत असून त्यांच्या हातात रोख पैसा येतो.



