ध्वनी प्रदूषण करणाऱ्या DJ चालकाविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांची कारवाई

मलकापूर : सार्वजनिक उत्सव, मिरवणुका तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करून कर्कश आवाजात DJ वाजविणाऱ्यांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार मलकापूर शहर पोलीस ठाणे हद्दीत ध्वनी प्रदूषणासंदर्भात कारवाई करण्यात आली.
मलकापूर शहरातील दोन वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये निवासी क्षेत्रात मोठ्या व कर्कश आवाजात DJ वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याचा आरोप DJ मालक आशिष रविंद्र अडकमोल, रा. सरस्वती नगर, भुसावळ, जि. जळगाव यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील MH-43-AD-0205 क्रमांकाच्या वाहनावरील MADDY Sound DJ चा वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्याकडून यापूर्वी पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर प्राप्त आदेशानुसार 18 सप्टेंबर 2026 रोजी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 694/2026, कलम 136 महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2000 मधील लागू तरतुदींनुसारही कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
सण-उत्सव शांततेत आणि पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून साजरे करावेत. मिरवणुकांमध्ये DJ किंवा ध्वनिक्षेपकाचा वापर करताना शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनी मर्यादा, वेळेच्या अटी आणि मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मलकापूर शहर पोलिसांनी केले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या DJ चालक व मालकांसह कार्यक्रमासाठी DJ आणणाऱ्या संबंधितांवरही प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.



