दोन दुचाकींच्या भीषण अपघातात १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; अंत्री खेडेकर गावावर शोककळा

दोन दुचाकींच्या भीषण अपघातात १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; अंत्री खेडेकर गावावर शोककळा चिखली
| प्रतिनिधी चिखली–जालना मार्गावरील रामनगर फाट्याजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात अंत्री खेडेकर येथील १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अंत्री खेडेकर गावावर शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अंत्री खेडेकर येथील रोहन कैलास माळेकर (वय १७) हा आपल्या दुचाकीवरून रोहडा येथील शेतात कामासाठी गेलेल्या आईला घरी आणण्यासाठी निघाला होता. दरम्यान, चिखली–जालना मार्गावरील रामनगर फाट्याजवळ दुसऱ्या दुचाकीशी त्याची जोरदार धडक झाली. या अपघातात रोहन गंभीर जखमी झाला.स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.अवघ्या १७ वर्षांच्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी गावात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली. रोहन हा शांत, मनमिळावू आणि कुटुंबाला हातभार लावणारा मुलगा असल्याने त्याच्या निधनाने कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



