आषाढ पौर्णिमा : धम्मचक्र प्रवर्तन, गुरु-शिष्य परंपरा आणि मानवकल्याणाचा प्रारंभ

पौर्णिमा : धम्मचक्र प्रवर्तन, गुरु-शिष्य परंपरा आणि मानवकल्याणाचा प्रारंभ
आषाढ पौर्णिमा : बौद्ध धम्म स्थापना दिवसाचा ऐतिहासिक व प्रेरणादायी वारसाआषाढ पौर्णिमा हा दिवस केवळ धार्मिक श्रद्धेचा नसून मानवतेच्या इतिहासातील एका महान वैचारिक क्रांतीची आठवण करून देणारा दिवस आहे. भगवान गौतम बुद्धांनी सारनाथ येथील मृगदाय वनात पंचवर्गीय भिक्खूंना दिलेल्या पहिल्या धम्मोपदेशातून बौद्ध धम्म आणि भिक्खू संघाची स्थापना झाली. त्यामुळे हा दिवस ‘बौद्ध धम्म स्थापना दिवस’ म्हणून ओळखला जातो.बौद्ध परंपरेत प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. बुद्धांच्या जीवनातील अनेक निर्णायक घटना पौर्णिमेच्या दिवशी घडल्याचा उल्लेख बौद्ध साहित्यामध्ये आढळतो. त्यापैकी आषाढ पौर्णिमेला विशेष स्थान आहे. याच दिवशी बुद्धांनी मध्यम मार्ग, त्रिशरण, पंचशील, चार आर्यसत्य, आर्य अष्टांगिक मार्ग आणि मानवकल्याणाचा संदेश प्रथमच समाजासमोर मांडला. हा उपदेश केवळ धर्माचा नव्हे, तर विवेक, करुणा आणि समतेवर आधारित जीवनमूल्यांचा पाया ठरला.भगवान बुद्धांनी आपल्या शिकवणीसाठी पाली भाषेची निवड केली. त्या काळातील सामान्य लोकांची ही संवादभाषा असल्याने त्यांचा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत सहज पोहोचला. यामुळे बौद्ध धम्माचा वेगाने प्रसार झाला. ‘त्रिपिटक’सारखे बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथही पाली भाषेतच रचले गेले आहेत. म्हणूनच आषाढ पौर्णिमा हा दिवस ‘पाली भाषा दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. पाली भाषेला अलीकडेच भारत सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला असून, ही तिच्या ऐतिहासिक योगदानाची योग्य दखल आहे.आषाढ पौर्णिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी गुरु-शिष्य परंपरेचा प्रारंभ झाला. बुद्धांचे पहिले पाच शिष्य—कौंडिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्दिय—यांनी बुद्धांना शरण जाऊन धम्माचा स्वीकार केला. हेच ‘पंचवर्गीय भिक्खू’ म्हणून प्रसिद्ध झाले. त्याचबरोबर वर्षावास परंपरेलाही याच दिवसापासून सुरुवात झाली. तीन महिन्यांच्या वर्षावासात भिक्खू एका विहारात राहून धम्मप्रसार करतात, ही परंपरा आजही कायम आहे.आज आषाढ पौर्णिमा अनेक ठिकाणी गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. मात्र बौद्ध समाजासाठी हा दिवस धम्माच्या स्थापनेची आणि मानवतावादी विचारांच्या उदयाची ऐतिहासिक स्मृती आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक व्यापक स्वरूपात समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. धम्मदेशन, त्रिपिटक वाचन, पाली भाषेवरील व्याख्याने, रक्तदान, वृक्षारोपण, समाजोपयोगी उपक्रम आणि विहारांमध्ये दीपप्रज्वलन अशा कार्यक्रमांद्वारे हा दिवस अधिक अर्थपूर्णपणे साजरा करता येऊ शकतो.आषाढ पौर्णिमा हा केवळ धार्मिक उत्सव नसून समता, करुणा, प्रज्ञा आणि मानवकल्याणाच्या मूल्यांचा जागर करण्याचा दिवस आहे. बुद्धांनी दिलेला धम्म हा कोणत्याही एका समाजापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे. त्यामुळे ‘बौद्ध धम्म स्थापना दिवस’ म्हणून या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करणे ही काळाची गरज आहे.—
जयसिंग वाघअजिंठा हाउसिंग सोसायटी,
अजिंठा चौक, जळगाव.



