जो विद्यार्थी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत नाही, तो भविष्यातील स्पर्धेत टिकू शकत नाही.कुलगुरू डॉ. नितीन राणे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली: प्रतिनिधी आरुना दत्तात्रय खंडागळे
अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘अनुस्पार्क २०२६’ महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभ
चिखली ( प्रतिनिधी ) : रविवार दिनांक १५ मार्च २०२६, अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय चिखली येथे आयोजित वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘अनुस्पार्क २०२६’ चा उद्घाटन सोहळा शनिवार, दि. १४ मार्च रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे महाविद्यालय परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण नन्हई होते. प्रमुख अतिथी म्हणून अवंतिका विद्यापीठ, उज्जैनचे कुलगुरू डॉ. नितीन राणे उपस्थित होते, तर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विजय नागरे यांनी मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थिती लावली याप्रसंगी मंचावर अवंतिका विद्यापीठ चे रजिस्ट्रार डाॅ. मनेष पाटील, संस्थेचे कोषाध्यक्ष सिध्देश्वर वानेरे, संस्थचे विश्वस्त आत्माराम देशमाने, वर्धमानशेठ डहाळे, अतहरोद्दीन काझी, पंढरीनाथ टेकाळे, शैलेंद्र भांगडीया, डाॅ. संजय घुगे, प्राचार्य डॉ. विरेनकुमार गिर्हे, प्राचार्य विजय लहाने, प्राचार्य बळीराम जाधव, डाॅ. राजेंद्र कोकाटे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डाॅ. जितेंद्र शिंदे, आदींसह प्रमुख उपस्थितीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अरुण नन्हई म्हणाले की, संस्थेचे जनक कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या प्रेरणेतून आणि संस्थेचे अध्यक्ष मा. आ. राहुलभाऊ बोंद्रे यांच्या दैदिप्यमान नेतृत्वात संस्था आज शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर संस्थेचा विशेष भर आहे. संस्थेच्या विविध शैक्षणिक शाखांमधून आतापर्यंत ७५०० हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ते आज देश-विदेशातील विविध नामांकित उद्योगसंस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच शासकीय व खासगी क्षेत्रातील प्रतिष्ठित पदांवर कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामुळे संस्थेचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी डॉ. नितीन राणे म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते ज्ञान मर्यादित ठेवू नये. नवकल्पना, संशोधन, सर्जनशीलता आणि कौशल्य विकास यांना महत्त्व देत विद्यार्थ्यांनी स्वतःला बदलत्या काळानुसार घडवले पाहिजे. महाविद्यालयीन जीवन हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडविण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा असून या काळात मिळणारे अनुभव त्यांच्या भविष्यातील यशाची पायाभरणी करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सांस्कृतिक, क्रीडा व बौद्धिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे.
यावेळी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विजय नागरे यांनी सांगितले की, शिक्षण ही केवळ नोकरी मिळविण्याची प्रक्रिया नसून ती समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक व बौद्धिक महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास, स्पर्धात्मक वृत्ती आणि संघभावना निर्माण करतात. ‘अनुस्पार्क २०२६’ सारखे महोत्सव विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांचे प्रदर्शन करण्याची मोठी संधी देतात, असेही त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयात आयोजित ‘अनुस्पार्क २०२६’ हा महोत्सव १४ ते १६ मार्चदरम्यान पार पडणार असून या कालावधीत विविध सांस्कृतिक, क्रीडा आणि बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नृत्य, गायन, नाट्य, फॅशन शो, तांत्रिक स्पर्धा तसेच विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या रंगतदार सादरीकरणांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डाॅ. जितेंद्र शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.✍🏻



