अकोलाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तेरवी टाळून ग्रामविकास युवा प्रतिष्ठान व गावकऱ्यांच्या सहकार्याने स्मशानभूमीचे नंदनवन करणारे हाता येथील श्री दिपक गावंडे

[महेंद्र जयदेवराव कराळे ]

संत तुकाराम महाराज असे म्हणतात स्मशान ते भूमी, प्रेतरूप जण!सेवाभक्तिहीन गाववासी!
म्हणजे ज्या गावातील लोक काही समाजसेवा करत नसतील तर ते गाव स्मशानाप्रमाणे असून तेथील लोक जिवंत असले तरी ते जिवंत प्रेतच आहेत. बाळापूर तालुक्यातील हाता हे एक छोटेसे गाव. येथील स्मशानभूमीची प्रचंड दुरवस्था झाली होती. उंच सखल भाग, सगळीकडे काटेरी झुडपे, लोकांना बसायला आणि उभे राहायला पण जागा नाही.सगळीकडे नुसती घाण आणि चिखल. स्मशानभूमीची ही दुरवस्था पाहून व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेले हाता येथील श्री दिपक गावंडे यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर तेरवी वगैरे कालबाह्य खर्च टाळून वडिलांचे मृत्यूनंतर तेरा दिवस होण्यापूर्वीच जेसीबी मशीन लावून स्मशानभूमीचे सपाटीकरण करून स्मशानभूमीला जाळीचे कुंपण बसवले. एवढेच नव्हे तर ग्रामविकास युवा प्रतिष्ठान व गावकऱ्यांच्या सहकार्याने तेथे वृक्षारोपण करून या उजाड, भकास स्मशानभूमीचे सुंदर नंदनवनात रूपांतर केले. निदान मेल्यानंतर तरी माणसाला चिरशांती लाभावी असे सुंदर वातावरण तयार केले.
बरेच जण आपल्या कुटुंबातील एखाद्या जेष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर 1000-2000 लोकांची मोठी तेरवी करतात किंवा एखाद्या बाबा-महाराजाचे कीर्तन आयोजित करतात यातून त्या मृत व्यक्तीला स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त होतो काय हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी दिपक गावंडे सारखे विज्ञानवादी व पर्यावरणवादी विचारसरणीचे लोक वेगळ्या वाटा निवडतात व गावाची, समाजाची सोय कशी होईल हा विचार करतात. दिपकभाऊ हे सगळं करत असतांना जात किंवा धर्म कुठलाही विचार न करता त्यांच्याकडून जे शक्य होईल ते करत राहतात. त्याचेच एक उदाहरण म्हणजे 2017 साली त्यांनी ग्रामविकास युवा संघटना व गावकऱ्यांच्या सहकार्याने बौद्ध स्मशानभूमीत वृक्षारोपण केले. आज ते वृक्ष मोठे झाले असून माणसांना सावली व पक्षांना सहारा देत आहेत.आपले वडील स्व.सेवकराम पांडुरंग गावंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी वाडेगाव येथील संत तुकाराम महाराज मंदिराला सुद्धा 51000 रु. देणगी देऊन वडिलांची चिरंतन स्मृती जोपासली आहे.साथ सेवा फाउंडेशन अकोला दरवर्षी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व वक्तृत्व कला विकसित व्हावी या उद्देशाने वक्तृत्व स्पर्धा घेत असते. दिपकभाऊनी मागील वर्षी या वक्तृत्व स्पर्धेला वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ 5000 बक्षीस दिले. आपल्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाला त्यांनी त्यांच्या गावातील त्यांच्या वडिलांचे मित्र असलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलावून त्यांना जेवण देऊन शेला,टोपी दुपट्टा व संपूर्ण कपडे देऊन सत्कार करत नविन पायंडा पाडला.
जवाहरलाल नेहरू म्हणत Action without thought is abortion and thought without action is folly! म्हणजेच विचाराशिवाय कृती निष्फळ असते तर कृतिविना नुसता विचार म्हणजे मूर्खपणा होय!शब्दांना कृतीची व कृतीला विचारांची जोड असल्याशिवाय परिणाम साधता येत नाही. बरेच जण अंधश्रद्धा, कर्मकांड, वैज्ञानिक दृष्टीकोन यावर भरभरून लिहितात आणि बोलतात. पण प्रत्यक्ष जेंव्हा कृतीची वेळ येते तेंव्हा पळ काढतात. पण दिपकभाऊंनी बोले तैसा चाले हे कृतीतून सिद्ध केले आहे. *त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी प्रेतावर खारीक, बदाम, मुरमुरे फेकू दिले नाहीत, विसाव्याच्या वेळी वेशिवर आपण जो आटा टाकतो तो आटा त्यांनी टाकू दिला नाही. त्यांच्यामते एकीकडे गरिबाला खायला खारीक, बदाम मिळत नसतांना आपण उगाच मस्ती का करावी ? तसेच आटा सांडून टाकणे हा एकप्रकारे त्या अन्नाचा व ते अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाचा अपमान होय.एवढंच नाहीतर त्यांनी टिटवे सुद्धा घरून घेण्यास विरोध केला होता त्यांच्या मते जेंव्हा माचीसचा शोध लागला नव्हता तेंव्हा प्रेताग्नी देण्यासाठी घरून विस्तव घेऊन जावे लागत असे त्या वेळी ती प्रथा योग्य होती पण आता त्याची गरज उरलेली नाही. त्यांच्या मते ते टिटव्याचे मडके न फोडता एखाद्या झाडाच्या बुंध्याशी ठेवावे जेणेकरून त्या झाडाला देखील पाणी मिळेल. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणारे दिपक भाऊ माझ्या नजरेत *Real Hero* आहेत. Hero म्हणजे नायक. भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे महान क्रिकेट खेळाडू कपिल देव यांना पत्रकाराने प्रश्न केला According to you, who is a hero ? त्यावर कपिल देव यांनी दिलेले उत्तर मला फार आवडले. ते म्हणाले.Everyone who does samething good for the society, who tries to make this beautiful earth more beautiful place to live in is a hero. And that hero may be in your school, in your society, in your family, in your friend.* म्हणजेच जो कोणी समाजासाठी काहीतरी चांगले करतो, या सुंदर पृथ्वीला अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करतो तो प्रत्येक व्यक्ती Hero (नायक ) होय! हाता गावातील या वृक्षारोपण कार्यास गावातील तरुण, गावकरी व महिलांचा फार मोठा वाटा आहे असे ते आवर्जून सांगतात.
या लेखाचा उद्देश दिपकभाऊंचा गवगवा करणे, त्यांची प्रसिद्धी करणे हा नाही तर त्यांच्यापासून प्रेरणा घेवून त्यांच्यासारखे काहीतरी करण्यासाठी कुणीतरी प्रवृत्त व्हावे हाच आहे.
दिपकभाऊ, तुम्ही करत असलेल्या या कार्याला मनापासून सलाम!🙏
अरे रिकामा कशाला फिरतं
तुझे गावच नाही का रे तीर्थ
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
महेंद्र जयदेवराव कराळे हिवरखेड 9421837760

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button