बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

महसूल अधिकाऱ्यांना आता जनतेसाठी दोन तासदुपारी ३ ते ५ नागरिक भेटीची वेळ निश्चित; बैठका व व्हिसीला बंदी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : महसूल विभागाच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांची भेट मिळण्यासाठी आता निश्चित वेळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यालयीन कामकाजाच्या प्रत्येक दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदारांसह संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी नागरिकांसाठी उपलब्ध राहावे, असे राज्य शासनाने निर्देश दिले आहेत.

महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना अनेकदा अधिकारी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करावी लागते. काही प्रकरणांमध्ये अधिकारी बैठकीत किंवा अन्य प्रशासकीय कामात व्यस्त असल्याने नागरिकांना पुन्हा कार्यालयात यावे लागते. ही परिस्थिती टाळण्यासाठी शासनाने नागरिक भेटीचा स्वतंत्र कालावधी निश्चित केला आहे.

विशेष म्हणजे, दुपारी ३ ते ५ या कालावधीत अधिकारी अन्य बैठका किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये व्यस्त राहू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी निश्चित केलेला वेळ प्रत्यक्ष भेटीसाठी वापरणे अपेक्षित आहे.

नागरिकांना भेटीची माहिती सहज मिळावी यासाठी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर भेटीची वेळ दर्शविणारा फलक लावावा लागणार आहे. नागरिक अधिकाऱ्यांना भेटल्याची नोंद ठेवण्यासाठी कार्यालयात मध्यवर्ती नोंदवहीची व्यवस्थाही करावी लागणार आहे.

एखाद्या दिवशी अत्यावश्यक शासकीय काम, अधिकृत दौरा किंवा मंत्र्यांच्या बैठकीमुळे अधिकारी उपलब्ध राहू शकत नसल्यास त्याची माहिती नागरिकांना आधीच देणे आवश्यक आहे. अशा वेळी नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी पर्यायी सक्षम अधिकाऱ्याची व्यवस्था करण्याचेही निर्देश आहेत.

जमीनविषयक प्रकरणे, फेरफार, सातबारा, विविध दाखले, शासकीय योजना आणि इतर महसूलविषयक कामांसाठी नागरिकांचा कार्यालयाशी नियमित संपर्क येतो. त्यामुळे ठरावीक दोन तासांचा हा उपक्रम प्रभावीपणे राबविल्यास नागरिकांना आपली अडचण थेट मांडण्याची संधी मिळणार असून, प्रशासनाकडून कार्यवाहीला गती मिळण्याची अपेक्षा आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button