खानदेशजळगावा जिल्हा

जळगावमधे टेबलावर रस्ता,टेबलाखाली गटार!

       जळगाव शहरातील रस्ते, गटार बाबत नागरिकांना जाणिवपूर्वक, नियोजनबद्ध अंधारात ठेवले जाते.जे काही माहिती मिळते ते फक्त पेपरमधून, जेंव्हा नगरसेवक किंवा आमदार कुदळ मारतो.हा रस्ता किती निधीचा , मक्तेदार कोण,कामाचा अवधी किती, आयुष्य किती ,किती रूंद,किती लांब हे काहीही उघड केले जात नाही.हा मक्तेदार आमदाराचा चमचा आहे कि भाचा ?पुतण्या आहे कि जावई? हे उघड करीत नाहीत.हा नगरसेवकाचा पंटर कि चमचा? हे उघड करीत नाहीत.या अंधारात भ्रष्टाचार दडलेला आहे.
   जळगाव शहरातील रस्ते, गटारी जे बनत आहेत ते जनतेच्या सोयीसाठी कमी पण नगरसेवक व आमदाराच्या कमाई साठी जास्त महत्वाचे आहेत.याचा शोध लागलेला आहे.रायसोनीनगर, तांबापुरा,गांधी मार्केट,आयएमआर कॉलेज,एसएमआयटी कॉलेज, खोटे नगर, अनुराग स्टेट बँक कॉलनी यात याचा शोध आणि बोध झाला.दोन वर्षांपासून वर्क ऑर्डर दिली.पण काम झाले नाही.किमान वर्क ऑर्डर दिली,हे तरी स्थानिक नागरिकांना माहिती केले पाहिजे.पण ते सुद्धा नाही.कारण दोन वर्षे झाली कि त्याच रस्त्यावर दुसरा रस्ता,त्याच गटारीवर दुसरी गटारीची वर्क ऑर्डर दिली जाते.कोणा नागरिकाच्या कानाला वारा न लागू देता निधी परस्पर हजम केला जातो.आक्षेप कोण घेणार?जर सर्वच चोर असतील तर.आणि आमदार त्यांचा मामा असेल तर! आपल्या आमदार मामांनी शहरातील चार रस्ते आत्ताच डांबरीकरण साठी वर्क ऑर्डर दिली.रस्ते अर्धवट बनले नाहीत तोपर्यंत तेच रस्ते सिमेंटचे बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे.आमदार, अभियंता तयारीत आहेत.यात करोडो रूपयाचा भ्रष्टाचार नियोजित आहे.करू द्यायचा का भ्रष्टाचार?
   जळगाव शहरातील एकाही नगरसेवकाने क्षेत्र सभा घेऊन आम जनतेला सांगितले नाही कि,अमुक ठिकाणी रस्ता किंवा गटारीची वर्क ऑर्डर दिली गेली.जोपर्यंत काम न करता कामाचे पेमेंट हजम केलें जात नाही.कारण या नगरसेवकांची या चोरीच्या कमाईची वाटणी केलेली असते.महापौराने कोणता रस्ता खायचा,कोणती गटार प्यायची,नगरसेवकाने कोणता रस्ता खायचा, कोणती गटार प्यायची,आमदाराने कोणता रस्ता खायचा,कोणता हायमास्ट लावायचा याची हिस्सा वाटणी अमावस्येच्या रात्री वडाच्या झाडाखाली अंधारात बसून केलेली असते.आपण सारे भाऊ भाऊ, नगरपालिका वाटून निटून खाऊ.असा कॉमन मिनीमम प्रोग्राम चालतो.जरी ते बाहेर उजेडात एकमेकांना टिक टॉक करीत असले तरीही त्यांची अंधारात चुप्पी छप्पी चालत असते.
    हा आरोप नाही.अनुभव आहे.रायसोनी नगर मधे गटारीची  वर्क ऑर्डर दोन वर्षांपासून मक्तेदाराला देऊन ठेवलेली आहे.स्थानिक नागरिकांना काहीही माहिती नाही.कानाला वारा नाही.ते नवरात्री उत्सवात नाचण्यात दंग होते.जेंव्हा आम्ही जळगाव जागृत जनमंच ने तेथे जाऊन जनता जागृत केली.मोहोळ माशा, गांधील माशा उठवल्या.भनकावल्या.तेंव्हा नगरसेवक व आमदारांना भनक लागली.आता आपल्या काळाबाजाराचा भंडाफोड होत आहे.तेंव्हा नगरसेवक व आमदार हजर झाले.म्हणे आता गटारीचे काम चालू करतो.एक रस्ता बनवून देतो.आतापर्यंत नगरसेवक आणि आमदार रायसोनीनगर मधे का गेले नाहीत? येथे गटारीची वर्क ऑर्डर दिली गेली ,असे का सांगितले नाही? कारण हे चोरीचे नियोजन होते.आता सात दिवसांपासून काम सुरू केले.तरीही तेथे कामाचे टेक्निकल इन्फॉर्मेशन बोर्ड लावलेले नाही.वर्क ऑर्डर ची प्रत आम्हाला दिलीच नाही,दाखवलीच नाही.का?लोकांना अंधारात ठेवून काम करायचे आहे.

उजेडात होते पुण्य,आंधारात पाप !
नगरसेवकांचे भरले पापाचे माप!!
हाच प्रकार दस्तुरखुद्द महापौर आणि विरोधी पक्ष नेत्याच्या प्रभाग मधे घडला.तांबापुरा मधे , फुकटपुरा मधे पुराचे पाणी घरादारात , दुकानात शिरले.बाया माणसे खाटा,गोधळ्या,बकऱ्या कोंबड्या घेऊन पळत होते.तरीही कोणीही महापौर किंवा नगरसेवक किंवा आमदार जाऊन सांगत नाहीत कि,पुढे गटार न बनवल्याने हे पाणी रस्त्यावर आले.घरात शिरले.दुकानात शिरले.आम्ही जळगाव जागृत जनमंच ने तेथे जाऊन मोहोळ माशा,गांधील माशा उठवल्या.तेंव्हा सिटी इंजिनिअर श्री सोनगिरे तेथे येऊन म्हणाले कि, सोमवारी येथे गटारीचे काम सुरू करतो.कसे काय?म्हणे ,याच गटारीची वर्क ऑर्डर गौरव पाटील नामक मक्तेदाराला फार पुर्वी देऊन ठेवली आहे.आणि हे आमदाराचे भाचे जावई आहेत.म्हणून आम्ही जास्त शहाणपणा करू शकत नाहीत.आणि गौरव पाटील यांनी हेच काम कोण्या नाईक नावाच्या सब ठेकेदाराला देऊन ठेवली आहे.येथे कोणतेही टेंडर गोपनिय नसते.ते आपसात वाटून घेतले जाते.हे मामाचे,हे भाऊचे,हे आप्पाचे.
ओपन स्पेसला कंपाऊंड करणे,ओपन स्पेस मधे गरज नसतांना,मागणी नसतांना संडास बांधणे असे प्रकार प्रभाग १२ मधे एम जे कॉलेज समोर रामदास कॉलनीत होत होता.पण स्थानिक नागरिकांनी हाणून पाडला.प्रत्येक घराला, शॉपिंग मॉल्स ला संडास असतांना आणखी हा वेगळा संडास कशासाठी? नगरसेवकांचे पोट भरण्यासाठी ?गरीब नागरिक राशन मागतात.श्रीमंत नगरसेवक संडास मागतात.
एमजे कॉलेज समोर चा रस्ता अनावश्यक रूंद गटार बांधून कोता केला आहे.मधेच वीजेचे खांब आहेत.वीस फुट रस्ता असाच अडवला गेला आहे,जो मोकळा करणे आवश्यक आहे.त्याकडे कोणत्याही नगरसेवकाचे किंवा आमदारांचे लक्ष नाही.का नाही? ती चार फूट रूंद गटार उघडी पडली आहे.मामा आणि महाजन म्हणतात,यालाच शांघाय म्हणा.यालाच हॉंगकॉंग म्हणा. रस्ता, गटार, संडास जनतेसाठी बनवायचेच नाहीत.ते त्यांचे घबाड भरण्यासाठी बनवायचे आहेत.
असे गौडबंगाल ,मामा भाचाचे खेळ , नगरसेवककांचे मेळ झालेले आहेत.म्हणून जनतेचे हाल होत आहेत.
जळगाव महापालिका कडे खूप मोठा निधी येतो.राज्य सरकार, केंद्र सरकार कडून.आपण नागरिक तगडा कर भरतो.अनपसनप.तर मग,हा पैसा जातो कुठे?हा पैसा महानगरपालिका सभागृहात शिरलेले लोक खाऊन जातात.रस्ते,गटारी, संडास टेबलावर बनतात.टेबलाखाली वाहातात.ते फक्त नगरसेवकांच्या कल्याणासाठी.जनतेच्या नाही.
कॉग्रेस सरकार ने भ्रष्टाचार केला तर कोण कारवाई करणार? त्यासाठी भाजप सत्तेवर आली पाहिजे.आणली.लावली इडी,घातली बेडी.आता भाजप सरकार भ्रष्टाचार करीत आहे.कारवाई कोण करणार ? त्यासाठी कॉंग्रेसला सत्तेवर आणले पाहिजे.हेच तत्व लोकशाहीत ,संविधानात वापरले गेले आहे.दर पांच वर्षांनी सत्ताबदल.म्हणून दर पांच वर्षांनी निवडणुक.हेच तत्व जळगाव महापालिका मधे वापरले गेले पाहिजे.एकही नगरसेवक रिपीट केला नाही तर करोडोचे घबाड याच नगरसेवकांच्या घशातून काढता येईल.याच भीतीने जळगाव महापालिकेचे दस्तावेज रद्दी दाखवून विकण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे.यात एकटा चव्हाण चोर नाही.सारे नगरसेवक व अधिकारी यात सामील आहेत.यांनी टेबलावर रस्ते आणि टेबलाखाली गटारी बनवल्या आहेत.नवीन नगरसेवक सभागृहात येण्याआधी ही दस्तावेज ची विल्हेवाट लावत आहेत.हाच प्रयोग महाराष्ट्र मंत्रालयात झालेला होता.
करा चोरी,लावा आग!
जळून जाईल,होईल खाक!

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button