खामगाव नगर परिषद घंटागाडी कामगारांचे बुलढाण्यात आमरण उपोषण; थकीत मानधन आणि अन्यायाविरुद्ध एल्गार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:-सागर रावनचोरे
खामगाव: (अजयसिंह राजपूत) कोरोना काळात कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून बेकायदेशीरपणे काढून टाकलेल्या खामगाव नगर परिषदेच्या घंटागाडी कामगारांनी आज, मंगळवार दिनांक ३० जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. कामगारांवर झालेल्या या अन्यायाविरोधात आणि सन २०२० पासूनच्या थकीत वेतनासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या संदर्भात आंदोलनाचे नेतृत्व करणारे अर्जदार विनोद प्रल्हाद इंगळे (रा. छत्रपती शिवाजी महाराज नगर, खामगाव) यांनी बुलढाणा येथील माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा कामगार अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे. कोरोना संकटकाळात कोणतीही पूर्वसूचना न देता ज्या कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून काढून बेरोजगार केले, त्या सर्व कामगारांना तातडीने कामावर पूर्ववत रुजू करून घेण्यात यावे. रोजगार गेल्यामुळे या कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सर्व कामगारांची सन २०२० पासून ते आजतागायतची थकीत मजुरी व इतर कायदेशीर थकबाकी संबंधित कंत्राटदाराकडून तात्काळ वसूल करून कामगारांना देण्यात यावी. ‘एस. आर. ग्रीन एम्पायर, नाशिक’ या कंत्राटदाराच्या चालू बिलांवर व सुरक्षा ठेवीवर तात्काळ स्थगिती आणून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा कामगार अधिकारी यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ बैठक (मिटिंग) आयोजित करावी आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासन यावर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



