कोथळी येथे भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यात अपघातांची मालिका कायम!
मुक्ताईनगर तालुक्यातील रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, शनिवारी रात्री कोथळी येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कोथळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रोडवरील हॉटेल योगायोग समोर शनिवारी (दि. 24 मे 2026) रात्री सुमारे 8 ते 8.30 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. हॉटेलच्या मागील बाजूकडून दुचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्या नामदेव भिल (रा. कोथळी) यांच्या दुचाकीची कोथळीहून मुक्ताईनगरकडे येत असलेल्या पवन नामदेव चौधरी (वय 32, रा. कोथळी) यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
धडक इतकी भीषण होती की, पवन चौधरी हे थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, दुसरे दुचाकीस्वार नामदेव भिल हे देखील गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
तालुक्यात वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



