जळगावातील प्लास्टिक उद्योग ठप्प! कच्च्या मालाची आयात रखडली….अमेरिका-इजराइल-इराण तणावाचा परिणाम….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
जळगाव : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक उद्योगांवरही दिसून येत आहे. अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य वातावरणामुळे जळगावातील प्लास्टिक उद्योगाला मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीमुळे कतार मधून होणारी कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्लास्टिक पाईप उत्पादन रखडले आहेत.
कच्चा माल वेळेवर उपलब्ध न झाल्याने आणि त्याच्या किमतीत तब्बल ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने जळगावमधील प्लास्टिक आणि कृषी पाईप उद्योगावर गंभीर परिणाम झाला आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी तयार होणाऱ्या प्लास्टिक पाईप उत्पादन करणाऱ्या अनेक कारखान्यांना कामकाज थांबवण्याची वेळ आली आहे.उद्योगाशी संबंधित व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, कच्चा माल मोठ्या प्रमाणावर परदेशातून आयात केला जातो. मात्र सध्याच्या आंतरराष्ट्रीय तणावामुळे आयात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असून उपलब्ध मालाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.



