दिव्यांग विद्यार्थ्यांनी घडविले मानवतेचे दर्शन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्याततील समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थी क्षेत्रिय भेट निमित्त तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी बोदवड येथील आत्मसन्मान मनोरुग्ण फाउंडेशन ला भेट दिली.’ *एक मुठ्ठी धान पुण्य महान ‘*या उक्तिप्रमाणेच आत्म सन्मान मनोरुग्ण फाउंडेशन येथील 56 मनोरुगणांकरिता मुक्ताईनगर तालुक्यातील या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तब्बल एक क्विंटल दहा किलो धान्य आपल्या परीने जमा केले. सदर उपक्रमाबद्दल विशेष शिक्षक श्री.नितीन झोपे व श्री.प्रवीण सोनवणे यांनी पुढाकार घेत इतर सर्व विशेष शिक्षकांच्या मदतीने हा उपक्रम पार पाडला. आत्मसन्मान फाउंडेशनचे संचालक श्री. प्रा.भगवान माळी सर यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना मनोरुग्ण व्यक्तींबद्दल माहिती दिली तसेच आत्मसन्मान फाउंडेशनतर्फे जे बरे झालेले मनोरुग्ण आहेत त्यांना घरी पाठवण्यापासून ते आत्मसन्मान फाउंडेशनच्या अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांच्या यशोगाथेपर्यंत सविस्तर माहिती दिली. श्री माळी सरांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांनी असाच मानवतावादी दृष्टिकोन पुढील आयुष्यात सुद्धा ठेवावा असे सांगितले. हरताळे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ज्ञानेश्वर पाटील यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना संबोधित करत यापुढेही असेच विविध उपक्रम राबवण्याचा संदर्भात मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विशेष शिक्षक श्री संजय पाटील ,विजय पाटील ,भूषण सोनवणे ,अश्विनी पाटील, वृषाली चौधरी व अमोल बावणे हे उपस्थित होते.



