BNS कलम 69 प्रकरणात 11 दिवसांनंतरही आरोपी फरार; ’48 तासांत अटक’चे पोलिसांचे आश्वासन

प्रतिनिधी : शंकर शिवरकर | देऊळगावराजाभारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69 अंतर्गत दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात तब्बल 11 दिवस उलटूनही आरोपीला अटक न झाल्याने संबंधित पीडित युवतीने बुधवारी (दि. 1 जुलै) पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. दरम्यान, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तपास अंतिम टप्प्यात असून पुढील 48 तासांत आरोपीला अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.पीडितेच्या माहितीनुसार, दि. 20 जून 2026 रोजी केतन पद्मकुमार गिरणीवाले याच्याविरुद्ध फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी BNS कलम 69 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल होऊन 11 दिवस लोटल्यानंतरही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडितेने केला.पत्रकार परिषदेत बोलताना पीडितेने सांगितले की, तपासाच्या प्रगतीबाबत माहिती घेण्यासाठी आपण वारंवार पोलीस ठाण्यात गेलो. मात्र, “तपास सुरू आहे, आमच्याकडे इतरही कामे आहेत,” असे सांगून समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. न्याय मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे आपण मानसिक तणावाखाली असून तातडीने कारवाई न झाल्यास आपल्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भावनाही तिने व्यक्त केली.पीडितेच्या म्हणण्यानुसार, तपास अधिकाऱ्यांनी तिला FIR ची प्रत घेऊन न्यायालयात जाण्याचा तसेच आरोपीच्या अटकपूर्व जामिनासंदर्भात कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. आरोपीला अटक केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिल्याचे तिने सांगितले.या प्रकरणाबाबत पत्रकारांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, “तपास योग्य दिशेने सुरू असून आवश्यक पुरावे संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील 48 तासांत आरोपीला अटक करण्यात येईल,” अशी माहिती देण्यात आली.दरम्यान, स्थानिक पत्रकारांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास जलदगतीने पूर्ण करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.कायद्यानुसार BNS कलम 69 हा गंभीर स्वरूपाचा अजामीनपात्र गुन्हा असला, तरी आरोपीला अटक होण्यापूर्वी सक्षम न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आरोपी अटकपूर्व जामीन मिळवून आपल्यावर दबाव आणू शकतो, अशी भीतीही पीडितेने व्यक्त केली आहे.आता पोलिसांनी दिलेल्या 48 तासांच्या मुदतीत आरोपीला अटक होते का, तसेच पुढील कायदेशीर प्रक्रिया कोणत्या दिशेने पुढे सरकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात पीडितेला वेळेत न्याय मिळावा आणि कायद्यावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ व्हावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



