निशीमुरा धूमकेतू ,येतोय! आकाशात नवा पाहुणा ,लवकरच पूर्व क्षितिजावर होणार दर्शन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय म घोडे प्रतिनिधी
तेल्हारा दि.९,
खगोलीय विश्वातील महत्वाची बातमी आपल्या सूर्यमालेत ग्रह, लघुग्रह, उपग्रह या सारखेच धूमकेतू सुद्धा सूर्यकुलाचेच घटक असल्याने वेगवेगळ्या कालावधीत ते सूर्याला प्रदक्षिणा करीत असतात. त्यात काही नियमित तर काही अनियमित स्वरूपाचे असतात.असाच एक
अनियमित स्वरूपाचा गेल्या महिन्यातच नव्याने शोधलेला नवीन धूमकेतू सध्या आपल्याजवळ येत असल्याने, आपल्याला पहाटे पूर्वेला पाहता येईल. या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रभाकर दोड संचालक, विश्वभारती यांनी केले आहे.
लांबलचक शेपटीचा धूमकेतू अर्थात शेंडे नक्षत्र म्हणून अशीही त्याची ओळख आहे. महिन्यात १२ ऑगस्टला जपानी हौशी खगोल अभ्यासक निशिमूरा यांनी याचा शोध लावला असून, त्यावेळी त्याचे अंतर पृथ्वी ते सूर्य अर्थात एक खगोलीय एकक एवढे होते. सध्या या धूमकेतूचे सूर्यापासूनचे अंतर ०-८४ खगोलीय एकक एवढे आहे. ११ सप्टेंबर रोजी पहाटे पूर्व आकाशात चंद्र आणि शुक्र यांची कर्क राशी समूहात युती होत आहे, त्यावेळी खालच्या पूर्वेकडील बाजूस सूर्योदयापूर्वी हा धूमकेतू आपल्याला पूर्व क्षितिजावर पाहता येईल, या वेळी त्याची दृश्य प्रत +४.७ असून अंधाऱ्या व निरभ्र आकाश असतांना आणि व्दिनेत्रीमधुन अधिक चांगली दिसेल. या धूमकेतूचे सूर्यापासून सरासरी अंतर जवळपास पृथ्वी ते सूर्य या अंतराच्या ५७ पट एवढे अंतर असते.
दिनांक ११ ते १७ सप्टेंबर या दरम्यान या नव्या धूमकेतूची दृश्यप्रत + २पर्यंत येत असल्याने पहाटे साधारण सव्वा पाच ते साडेपाचच्या आसपास पूर्व क्षितिजावर या नवीन पाहुण्याचे स्वागत व दर्शनाचा लाभ घेता येईल.



