खामगाव तालुक्याला गारपिटीने झोडपले….

…(जीडी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी) खामगाव. कधी नव्हे यंदाच्या उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. २५ एप्रिल रोजी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱ्यामुळे आंबेटाकळी येथील शाळेवरील टीनपत्रे उडून गेली होती. तर आज २६ एप्रिल रोजी पुन्हा तालुक्याला गारपिटीने झोडपले आहे. तालुक्यातील रोहना, वर्णा, कंझारा, दिवठाणा, पोरज निमकवळा, काळेगाव, तांदुळवाडी, भालेगाव परिसरात आज २६ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तुफान गारपीट झाली आहे. मागील काही दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या संकटातून बाहेर कसे पडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. मागील मार्च महिन्यात अवकाळी पाऊस बरसला होता. तर एप्रिल महिन्यातही अवकाळी पाऊस सुरूच असल्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. झालेल्या नुकसानाची भरपाई येथील खामगाव तालुक्यातील शेतकरी मागणी करीत आहे……….✍️



