खानदेशमहाराष्ट्रविदर्भ

पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर कराजिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांचे निर्देश; सिंदखेड राजा तालुक्यात दुष्काळ, चारा व पाणीटंचाईचा आढावा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यात निर्माण झालेली कोरड्या दुष्काळाची परिस्थिती, पावसाच्या ताणामुळे शेती पिकांचे झालेले नुकसान तसेच आगामी काळातील संभाव्य चारा व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा येथे घेण्यात आली. यावेळी दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन विविध विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये
पावसाच्या ताणामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्यातील उर्वरित सर्व पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी दिले.
पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पंचनाम्याची कार्यवाही पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चारा व पाण्याचे आतापासून नियोजन
आगामी काळात पशुधनासाठी चारा व पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन चारा छावण्या, चारा डेपो आणि पशुखाद्याच्या उपलब्धतेचे आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. पशुधनाची संख्या व संभाव्य गरज लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार ठेवण्यास सांगण्यात आले.
पाणीटंचाईग्रस्त गावांची यादी तयार करण्याच्या सूचना
तालुक्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांची तातडीने यादी तयार करून आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, नळ योजनांची दुरुस्ती तसेच पर्यायी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी संबंधित विभागांनी पूर्वनियोजन करून आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी सांगितले.
टंचाई निवारणात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही
“तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना दुष्काळाच्या काळात सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध आहे. टंचाई निवारणाच्या कामात कोणतीही हलगर्जी किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेऊन आवश्यक त्या उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात,” असे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांनी निर्देशित केले.
बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, गटविकास अधिकारी अजित बांगर, मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, तालुका कृषी अधिकारी भुते, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी भोसले यांच्यासह पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीअंती सर्व संबंधित विभागांना दुष्काळ व टंचाई परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी तातडीने कार्यवाही करून केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button