सातपुड्यात अस्वलाची दहशत; भिंगारा शिवारात १३ वर्षीय मुलीवर जीवघेणा हल्ला…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
जळगाव जामोद:- २४ सप्टेंबर २०२६
अस्वलाच्या झडपेत गायत्री डावर गंभीर जखमी अकोला येथे उपचार सुरू शेतकरी,महिला व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगराळ भागातील भिंगारा, पोस्ट सुनगाव परिसरात अस्वलाने १३ वर्षीय मुलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात गायत्री भाईलाल डावर ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री डावर ही आपल्या बहिणीसोबत भिंगारा शिवारातील शेतात गेली होती. दुपारच्या सुमारास अचानक अस्वल त्यांच्या जवळ आले आणि काही कळण्याच्या आतच अस्वलाने गायत्रीवर झडप घातली. या हल्ल्यात तिच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. प्रसंगावधान राखत झाडावर चढून वाचवला जीव
हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी गायत्रीने प्रसंगावधान राखत जवळच्या झाडाचा आधार घेतल्याचे वृत्त आहे. जखमी अवस्थेतही तिने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिच्या बहिणीने तातडीने गावाकडे धाव घेत कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर आई-वडील व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले.
जळगाव जामोदहून अकोल्याला हलविले घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमी गायत्रीला तातडीने जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमांची गंभीरता लक्षात घेऊन तिला पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. भिंगारा परिसरात भीतीचे वातावरण
या घटनेनंतर भिंगारा परिसरातील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीच्या कामासाठी दररोज शेतात जावे लागत असल्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात यापूर्वीही अस्वलाचा वावर आणि हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. सन २०२४ मध्ये बन्सी डावर यांच्यावरही अस्वलाने हल्ला केल्याची माहिती स्थानिक वृत्तांत देण्यात आली आहे. वन विभागाने गस्त वाढविण्याची मागणी अस्वलाचा वावर सातपुडा परिसरातील शेतांमध्ये वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने परिसरात गस्त वाढवावी, अस्वलाच्या हालचालींचा शोध घ्यावा आणि शेतकरी व ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
“शेतात पिकांची राखण करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनाच आता वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती वाटत आहे. प्रशासनाने आणखी एखादी गंभीर घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने उपाययोजना कराव्यात,” अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे…….✍️



