गणरायांच्या सन्मानासाठी पुनखेड्यातील युवक सरसावले!

भोकर नदीपात्रातील गणेशमूर्ती एकत्रित करून तापी नदीत केले विधिवत विसर्जन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता. प्रतिनिधी – विकास आमोदकर
रावेर तालुक्यातील पुनखेडा येथे युवकांनी गणेशमूर्तींचा सन्मान राखत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. भोकर नदीपात्रातील पाणी आटल्यामुळे विसर्जनानंतर काही गणेशमूर्ती अर्धवट अवस्थेत नदीपात्रात पडून असल्याचे निदर्शनास आले.
ही बाब लक्षात येताच श्रद्धा सबुरी बूट हाऊसचे संचालक व ब्लॉगर चि. तुषार रामचंद्र कोळी यांनी गावातील युवकांच्या मदतीने नदीपात्रात पडून असलेल्या गणेशमूर्ती एकत्रित केल्या. त्यानंतर सर्व गणेशमूर्तींचे तापी नदीत विधिवत विसर्जन करण्यात आले.
या उपक्रमात धनराज कोळी, रुपेश चौधरी, अविनाश चौधरी, अतुल सपकाळे, भैया पाटील, भूषण पाटील, गणेश कचरे, हर्षल पाटील, धनपाल रायमाळे, सोनू चौधरी, मोनू चौधरी, सौरव चौधरी, श्रेयश चौधरी व नेतिक पाटील यांच्यासह गावातील युवक सहभागी झाले.
गणेशमूर्तींचा सन्मान राखत त्यांचे योग्य पद्धतीने विसर्जन करण्यासाठी युवकांनी घेतलेल्या या पुढाकाराचे परिसरातून कौतुक होत आहे.



