राष्ट्रीय लोकअदालतीत बुलढाणा जिल्ह्यात १ हजार २०९ प्रकरणे निकाली

११ कोटी ५ लाख ४ हजार ६५ रुपये तडजोड शुल्क वसूल; मोटार अपघात प्रकरणात ४२ लाखांची नुकसानभरपाई
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलढाणा, दि. १३ : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत एकूण २५ हजार ६१३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १ हजार २०९ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, एकूण ११ कोटी ५ लाख ४ हजार ६५ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा तथा वकील संघ बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमूर्ती बुलढाणा न्यायिक जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा एस.डी. जगमळणी यांच्या उपस्थितीत लोकअदालतीचे कामकाज पार पडले.
दरम्यान, पॅनेल प्रमुख न्यायाधीश तथा तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश, मलकापूर यांनी मलकापूर येथे मोटार अपघात प्रकरण तडजोडीने निकाली काढले. या प्रकरणात मृताच्या वारसांना ४२ लाख रुपयांची नुकसानभरपाई अदा करण्याचा धनादेश देण्यात आला. सदर प्रकरणाच्या तडजोडीसाठी एच.डी.एफ.सी. एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीचे वकील बी.बी. पांडे तसेच अर्जदारांचे वकील आर.एम. रावळ यांनी विशेष प्रयत्न केले. लोकअदालतीच्या माध्यमातून प्रकरणाचा जलदगतीने निपटारा झाल्याने अर्जदारांना वेळेत न्याय मिळण्यास मदत झाली.
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून नागरिकांना परस्पर संमतीने व तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्याची संधी मिळते. त्यामुळे वेळ व खर्चाची बचत होऊन पक्षकारांना जलद न्याय मिळण्यास मदत होते.











