गणरायाच्या आगमनाआधी वरुणराजाची हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी शंकर शिवरकर
देऊळगाव राजा (दिनांक १३ सप्टेंबर) : गणरायाच्या स्थापनेच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी वरुणराजाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला जोरदार बरसलेल्या पावसाने सुमारे अर्धा तास परिसराला झोडपून काढले. त्यानंतरही आकाशात गर्द ढगांची दाटी कायम असून पावसाची संततधार सुरू होती.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची चिंता वाढली होती. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी रविवारी झालेला पाऊस दिलासादायक ठरला आहे. विशेषतः सोयाबीन सध्या शेंगांच्या अवस्थेत असून, कापूस बोंडधारणेच्या तर तूर वाढीच्या अवस्थेत आहे. या पिकांना सध्याच्या टप्प्यावर पाण्याची आवश्यकता असल्याने झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव जो वाढत होता त्यावर नियंत्रण येऊ शकते.
रात्रीही पावसाची संततधार कायम राहिल्यास जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होऊन सोयाबीनच्या शेंगांना दाणे भरण्यासह कापूस व तूर पिकांना मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य उत्पादन घट आणि आर्थिक नुकसानीचा फटका काही प्रमाणात कमी होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
दरम्यान, आकाशात अजूनही गर्द ढगांची दाटी असून पावसाची शक्यता कायम आहे. रात्री समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पिकांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. गणरायाच्या आगमनापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.











