फैजपूर पालिकेच्या दवाखान्यात प्रसूतिगृह सुरू करा; मुस्लिम कब्रस्थानात वजूखान्याची व्यवस्था करण्याची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : विनोद तायडे
फैजपूर नगरपरिषदेच्या दवाखान्यात बंद असलेले प्रसूतिगृह तातडीने सुरू करावे तसेच शहरातील मुस्लिम कब्रस्थानात वजू करण्यासाठी व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करावी, या मागणीसाठी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना निवेदन दिले.
फैजपूर नगरपरिषदेचे सौ. लीलावती प्रसूतिगृह पूर्वी सुरू होते. त्यावेळी शहराची लोकसंख्या तुलनेने कमी असतानाही प्रसूतिगृह कार्यरत होते. मात्र, आज फैजपूर शहराची लोकसंख्या ४० हजारांहून अधिक झाली असतानाही हे प्रसूतिगृह बंद असल्याने शहरातील गोरगरीब नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. फैजपूरला लागून अनेक गावांचा परिसर असल्याने प्रसूतिगृह पुन्हा सुरू करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच फैजपूर नगरपरिषद हद्दीतील मुस्लिम बांधवांच्या कब्रस्थानात वजू करण्यासाठी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नसल्याने दफनविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कब्रस्थान परिसरात वजूखाना उभारावा, तसेच कब्र खोदण्यासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी एक छोटी खोली बांधून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
कब्रस्थानाच्या खिरोद्या रस्त्याकडील गेटमधून इस्लामपुरा, हजिरा मोहल्ला, तडवी वाडा, झोपडपट्टी आणि तहानगर परिसरातील नागरिक दफनविधीसाठी येत असतात. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी आरोग्य समिती सभापती हकीम तडवी, माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान,काँग्रेस गटनेते शेख इरफान, नगरसेवक शेख युनूस शेख अय्युब, नगरसेवक पवन सराफ,डॉ. शेख दानिश निसार आणि शेख आवेश शेख महेमुद यांनी निवेदन दिले. मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी निवेदन स्वीकारले.



