शेलसुरचे सुपुत्र हरिदास कापसे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी प्रशांत चव्हाण
बुलढाणा-: (दि.८ ऑगस्ट) उत्तराखंड येथील अतिउंचावरील दुर्गम भागात कर्तव्यावर कार्यरत असताना बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र तथा भारतीय सैन्य दलातील हवालदार हरिदास मधुकर कापसे यांना वीरमरण आले आहे. या घटनेमुळे शेलसुरसह संपूर्ण चिखली तालुक्यावर आणि बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. हवालदार हरिदास कापसे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील शेलसुर येथील रहिवासी असून, सध्या त्यांचे कुटुंब चिखली शहरातील दांडे ले-आऊट येथे वास्तव्यास आहे. ते भारतीय सैन्य दलाच्या ‘बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप’ (BEG) मधील ‘४११ (स्वतंत्र) पॅरा फील्ड कंपनी, आग्रा’ येथे कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती उत्तराखंड राज्यातील अतिउंचावरील सीमावर्ती भागात होती. गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी कर्तव्यावर तैनात असताना कापसे यांना अचानक मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. त्रास जाणवू लागल्याने ते स्वतः चालत जवळील मेडिकल रूममध्ये गेले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर परिस्थिती सामान्य वाटल्याने ते पुन्हा सैनिकाच्या निष्ठेने आपल्या कर्तव्यावर परतले. मात्र, काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते अचानक खाली कोसळून बेशुद्ध पडले.
त्यांना तातडीने पुन्हा वैद्यकीय कक्षात हलवून सैनिकी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रातून शोक भावना व्यक्त होत आहे.



