डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धुळे रेल्वे प्रवासाची नोंद व्हावी; रेल्वे प्रशासनाकडे प्रतिमा व स्मृतिफलकाची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जळगाव | प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे भेटीची आणि रेल्वे प्रवासाची ऐतिहासिक नोंद धुळे रेल्वे स्थानकावर जतन करण्यात यावी, अशी मागणी प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक प्रवासाची अनेक रेल्वे स्थानकांनी स्मृती जपली असताना धुळे रेल्वे स्थानकावर मात्र त्याची कोणतीही नोंद नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ३१ जुलै १९३७ आणि १७ जून १९३८ रोजी चाळीसगाव–धुळे पॅसेंजर रेल्वेने धुळे येथे आले होते. त्याच रेल्वेने ते चाळीसगावला परत गेले होते. या भेटीदरम्यान त्यांनी धुळे येथे एक दिवस मुक्कामही केला होता. या ऐतिहासिक घटनेची नोंद धुळे रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागावर बाबासाहेबांची प्रतिमा आणि त्यांच्या आगमनाच्या तारखांसह करण्यात यावी, अशी मागणी जयसिंग वाघ यांनी स्टेशन मॅनेजर शेख गुलाब अहमद यांची भेट घेऊन केली.धुळे दौऱ्यादरम्यान जयसिंग वाघ यांनी लांडोर बंगला आणि संदेश भूमी या ऐतिहासिक स्थळांना भेट देत बाबासाहेबांच्या मुक्कामासंदर्भातील अभ्यासपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. तसेच लळिंग गावालाही भेट देऊन बाबासाहेबांच्या आगमनाशी संबंधित ऐतिहासिक घटनांचा आढावा त्यांनी ग्रामस्थांसमोर मांडला. पुनाजी अण्णा लळिंगकर यांच्या निमंत्रणावरून बाबासाहेब लळिंग येथे आले होते, त्या भेटीचे ऐतिहासिक महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी डॉ. उल्हास तासखेडकर, डॉ. प्रकाश वानखेडे, दिलीप तासखेडकर, चंद्रगुप्त सुरवाडे, सोमा भालेराव, डी. आर. वानखेडे, गौतम वाकोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.बाबासाहेबांच्या धुळे भेटीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन स्थानकावर कायमस्वरूपी स्मृतिफलक व प्रतिमा उभारावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.



