आपली एक छोटीशी चूक संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते” – पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन

सायबर गुन्हे, सोशल मीडियाचे धोके आणि करिअरची जाणीव; रावेरमध्ये विद्यार्थिनींशी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचा संवाद
रावेर | प्रतिनिधी : विकास आमोदकर
रावेर येथील शिक्षण संवर्धक संघ संचलित सौ. कमलबाई एस. अग्रवाल महिला विद्यालयात रावेर पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थिनींसाठी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत सायबर गुन्हे, महिलांची सुरक्षा, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि जीवनातील योग्य निर्णयांचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक संदीप पाटील म्हणाले की, “आपली एक छोटीशी चूक संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची व अपेक्षांची नेहमी जाणीव ठेवा.” त्यांनी विद्यार्थिनींना भवितव्य घडविताना शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देताना त्यांनी KYC अपडेटच्या नावाखाली होणारी फसवणूक, ATM कार्डचा CVV क्रमांक, OTP, PIN यांसारखी गोपनीय माहिती मागून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून सतर्क राहण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती घेऊन वेळेवर पोलिसांशी संपर्क साधल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय कौटुंबिक अत्याचार, अनधिकृत मोबाईल अॅप्सचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा अतिरेक, सोशल मीडियामुळे होणारे दुष्परिणाम तसेच अल्पवयीन विवाह आणि प्रेमाच्या आहारी जाऊन आयुष्याची होणारी हानी याविषयीही त्यांनी विद्यार्थिनींना सावध केले. कोणतीही अडचण किंवा मनाविरुद्ध घटना घडल्यास ती लपवून न ठेवता पालक, विश्वासू नातेवाईक किंवा पोलिसांशी संवाद साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा कुलकर्णी या होत्या. यावेळी उपमुख्याध्यापक रमण तायडे, एम. एच. पाचपोहे, एस. एच. कोल्हे, सुरेश विचवे, मोहन महाजन, एम. एम. गडे, सुनील महाजन, मनीषा पवार, श्री. राठोड, के. एम. पाटील, सुनीता पाटील, दीपक नगरे, चंद्रकांत विचवे आणि हिरालाल गुमडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी केले, तर एस. एन. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थिनींनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.



