खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीसह दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी शंकर शिवरकर

अंढेरा ; येथील एका विवाहित तरुणाने कथित मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी मृताच्या पत्नीसह तिच्या कथित परिचिताविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंढेरा येथील सूरज रामभाऊ तेजनकर याचा विवाह २०२१ मध्ये मोहाडी येथील वंदना ज्ञानेश्वर रिंडे (सध्या वंदना सूरज तेजनकर) हिच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. मुलगी नऊ महिन्यांची असताना वंदना ही माहेरी निघून गेली व तेव्हापासून ती तेथेच राहत होती.
फिर्यादीनुसार, वंदना हिचे बोरगाव काकडे येथील सतीश रामेश्वर काकडे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय सूरजला आला होता. या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर सूरजने पत्नीकडे घटस्फोट (फारकती) देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावरूनही दोघांमध्ये वाद वाढले. तसेच पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मानसिक त्रास दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
या सर्व प्रकारामुळे मानसिक तणावात असलेल्या सूरजने २३ जुलै रोजी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या दिराच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मृताची आई शशिकला रामभाऊ तेजनकर (वय ६०, रा. अंढेरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंढेरा पोलीस ठाण्यात कायम गुन्हा क्रमांक २४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ व ३(५) अंतर्गत सतीश रामेश्वर काकडे (रा. बोरगाव काकडे, ता. चिखली) व वंदना सूरज तेजनकर (रा. मोहाडी, ता. सिंदखेडराजा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश देढे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश घुगे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button