आ. श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकाराने मंगरूळ नवघरेतील आमरण उपोषण मागे; शिक्षक प्रश्नावर प्रशासनाची सकारात्मक भूमिका

विद्यार्थ्यांच्या हितासाठी तातडीने हालचाल; मंगरूळ नवघरेतील उपोषणाला यशस्वी पूर्णविराम
मंगरूळ नवघरे | प्रतिनिधी
मंगरूळ नवघरे येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील शिक्षकांच्या प्रश्नावर ग्रामस्थांनी सुरू केलेले आमरण उपोषण आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर मागे घेण्यात आले. प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन स्थगित करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची माहिती मिळताच आमदार श्वेता महाले पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित कोणताही प्रश्न दुर्लक्षित केला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यानंतर त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित पाच शिक्षकांच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करून तो विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. तसेच शाळेच्या गरजेनुसार नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव त्वरीत तयार करण्याबाबत शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनाही निर्देश दिले.
यावेळी बोलताना आमदार श्वेता महाले पाटील यांनी ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांना पुन्हा जिल्हा परिषद शाळेकडे वळविण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून त्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असेल, तर प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. आमदार श्वेता महाले पाटील यांच्या वतीने त्यांचे वडील अंकुशराव पाटील यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी भास्करराव मोरे, कुणाल गायकवाड, एकनाथराव जाधव, संतोष वाकडे, श्री. जैन, प्रवीण वायाळ यांच्यासह ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून हा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले गेल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.



