आरक्षण आमच्या हक्काचं, कुणाच्या बापाचं नाही’; विधानभवनावर भीमसैनिकांचा एल्गार, उपवर्गीकरणाला तीव्र विरोध

मुंबई | प्रतिनिधीअनुसूचित जाती (एससी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात मंगळवारी (३० जून) मुंबईत काढण्यात आलेल्या विराट महामोर्चात सम्राट अशोक सेना, महाराष्ट्र राज्यने सक्रिय सहभाग नोंदवत आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने रद्द करण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील मेट्रो सिनेमा येथून सुरू झालेला हा मोर्चा विधानभवनावर धडकला.भर पावसात लाखो भीमसैनिकांनी मोर्चात सहभागी होत उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. “आरक्षण आमच्या हक्काचं, कुणाच्या बापाचं नाही”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो”, “जय भीम” अशा घोषणांनी विधानभवन परिसर दुमदुमून गेला.सम्राट अशोक सेनेचे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आकाश दादा शिरसाट यांनी सांगितले की, अनुसूचित जातीतील सर्व समाजघटकांना समान आरक्षणाचा लाभ मिळत असताना उपवर्गीकरणाची गरज काय आहे, याचे स्पष्ट उत्तर राज्य सरकारने द्यावे. तसेच, बदर समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसताना आणि अद्ययावत जातनिहाय माहिती उपलब्ध नसताना उपवर्गीकरणाचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.यावेळी उपवर्गीकरण नेमके कोणत्या क्षेत्रासाठी प्रस्तावित आहे—शिक्षण, नोकरी, आर्थिक लाभ, राजकीय प्रतिनिधित्व किंवा अन्य कोणत्या बाबीसाठी—याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली.आरक्षण ही गरिबी हटाव योजना नसून संविधानाने दिलेली समान संधी असल्याचे सांगत, आरक्षणाचे उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जाती समाजात कृत्रिम विभागणी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. भारतीय राज्यघटनेतील समतेच्या तत्त्वांना बाधा पोहोचविणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, अशी भूमिका सम्राट अशोक सेनेने व्यक्त केली.मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारने आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रस्ताव मागे घेऊन तो रद्द करावा, तसेच या विषयावर पारदर्शक भूमिका मांडावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.



