मुक्ताईनगरच्या आर्या महल्लेसह ११ विद्यार्थ्यांची ‘ChargeShare’ची कमाल; ई-वाहन चार्जिंगसाठी स्मार्ट ॲप विकसित

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
एलआरटी कॉलेजच्या ‘शार्क टँक’ स्पर्धेत ‘ChargeShare’ची झेप; एकाच ॲपवर अनेक ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुविधा
मुक्ताईनगर प्रतिनिधी :
अकोला येथील एलआरटी कॉलेजमध्ये आयोजित ‘शार्क टँक’ स्पर्धेसाठी वाणिज्य (सीए) शाखेच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या ‘ChargeShare’ या नाविन्यपूर्ण ॲपची सर्वत्र चर्चा होत आहे. बाहेती एज्युकेशन क्लासेसच्या ११ विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या चमूने तयार केलेले हे स्मार्ट चार्जिंग प्लॅटफॉर्म इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी अधिक सोयीस्कर ठरणार आहे. या यशस्वी टीममध्ये मुक्ताईनगर येथील विद्यार्थिनी आर्या मुकेश महल्ले हिचा समावेश असल्याने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
‘ChargeShare’ हे इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) विकसित करण्यात आलेले स्मार्ट चार्जिंग प्लॅटफॉर्म असून, मोबाईल रोमिंगप्रमाणे एकाच ॲपद्वारे विविध कंपन्यांच्या चार्जिंग स्टेशनचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. यापूर्वी अशा प्रकारची संकल्पना अमेरिकेत वापरली जात होती. आता त्याच धर्तीवर भारतातही हे तंत्रज्ञान उपलब्ध होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
या ॲपच्या माध्यमातून दुचाकी, चारचाकी तसेच ट्रक चालकांना एकाच ॲप किंवा RFID कार्डच्या साहाय्याने विविध कंपन्यांच्या उपलब्ध चार्जिंग स्टेशनवर वाहन चार्ज करता येणार आहे. वाहन चार्ज होण्यासाठी साधारण ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. तसेच १२० किलोमीटरच्या परिसरातील उपलब्ध चार्जिंग स्टेशनची माहितीही ॲपवर मिळत असल्याने चालकांचा वेळ, इंधनाचा खर्च आणि नियोजन अधिक सुलभ होणार आहे.
विशेष म्हणजे, ईव्ही फ्लीट चालविणाऱ्या कंपन्यांना विविध चार्जिंग नेटवर्कसाठी वेगवेगळी ॲप्स, पेमेंट प्रणाली आणि बिलिंग व्यवस्थापनाची अडचण भेडसावत होती. ‘ChargeShare’मुळे या सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असल्याने कंपन्यांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होण्यास मदत मिळणार आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळून पर्यावरणपूरक वाहतुकीलाही प्रोत्साहन मिळेल.
‘ChargeShare’ची प्रमुख वैशिष्ट्ये :
- एकाच ॲपद्वारे अनेक चार्जिंग स्टेशनचा वापर
- एकत्रित बिलिंग व सुलभ पेमेंट
- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित योग्य चार्जिंग स्टेशनची माहिती
- वेळ व खर्चाची बचत
- ईव्ही फ्लीट व्यवस्थापन अधिक सुलभ
‘ChargeShare’ ॲप विकसित करणाऱ्या टीममध्ये आर्या महल्ले, वैष्णवी पाटील, अदिती लड्डा, भूमिका अग्रवाल, वेदिका पोहरे, सई जोरगेकर, हनी वोरा, रुद्र जैन, ओम वाघ, कार्तिक सोनी आणि दक्ष रांडद यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यात ई-वाहन क्षेत्रात हे ॲप महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



