मोरगाव बु. ते आटवाडे रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांत रस्ता की रस्त्यात खड्डे? नागरिक संतप्त

मोरगाव प्रतिनिधी : संतोष ढिवरे
रावेर तालुक्यातील मोरगाव बु. ते आटवाडे (प्र.ज.मा. 17) या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठेमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता “रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येत असतानाही संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग रावेर यांनी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
या मार्गाचा वापर दररोज शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच व्यापारी मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे काही ठिकाणी बससेवेलाही अडथळे निर्माण होत असल्याची माहिती समोर आली आहे.
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना या रस्त्याची स्थिती अधिकच धोकादायक बनण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येणार नाही आणि अपघातांची शक्यता वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, याच रस्त्यावर आठ दिवसांपूर्वी गंभीर अपघात घडल्याची माहिती समोर आली असून त्याला खराब रस्ता कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास भविष्यात आणखी मोठे अपघात घडू शकतात, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव, संबंधित प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी तातडीने या रस्त्याची पाहणी करून आवश्यक निधी उपलब्ध करून दर्जेदार दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी केली आहे. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.



