मद्यधुंद चालकामुळे अपघाताचा संशय; हातनीजवळ पिकअप उलटून लाखोंचे नुकसान

हातनी गावानजिक बोलेरो पिकअपचा भीषण अपघात; डाळिंबाच्या मालाचे मोठे नुकसान, जीवितहानी टळली
मद्यधुंद चालकामुळे अपघाताचा संशय; हातनीजवळ पिकअप उलटून लाखोंचे नुकसान
हातनी गावानजिक बोलेरो पिकअपचा भीषण अपघात; डाळिंबाच्या मालाचे मोठे नुकसान, जीवितहानी टळली
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण
चिखली, दि. 31 जून : तालुक्यातील हातनी गावाजवळील धोकादायक वळणावर सोमवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास डाळिंबाचा माल वाहून नेणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनासह डाळिंबाच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एमएच २८ बीबी ९२७८ क्रमांकाची बोलेरो पिकअप बुलढाण्यावरून डाळिंबाचा माल घेऊन चिखलीकडे येत होती. हातनी गावाजवळील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाले.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून हा अपघात घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अपघातग्रस्त वाहन व चालक हे मेहकर येथील असल्याची माहितीही स्थानिकांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला वाहनातून सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी चिखली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.
या घटनेमुळे काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. अपघातामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले असून डाळिंबाच्या मालाचीही मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. संबंधित घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
— स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस



