ऐतिहासिक जलंब नगरीत ३० मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सोहळ्याचे आयोजन….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
शेगाव:- २४ मे २०२६
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक पदस्पर्शाने पावन झालेल्या जलंब नगरीत शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी भव्य “डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श सोहळा” मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आंबेडकरी समाजासह नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, रेल्वे स्टेशन जवळ, जलंब येथे सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहे. बाबासाहेबांच्या जलंब येथील ऐतिहासिक भेटीच्या स्मृतींना उजाळा देत सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुतेचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन भंते राजज्योती यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आ. देवाभाऊ हिवराळे जिल्हाअध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बुलढाणा हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भीमगीतांच्या सुरांनी वातावरण भारावून जाणार आहे. यामध्ये गायक धम्मानंद शिरसाट (अकोला)
अश्विनीताई राजगुरु (मुंबई) आणि महेंद्र सावांग (खामगाव) हे आपल्या सादरीकरणातून उपस्थितांना प्रेरित करणार आहेत.
जलंब रेल्वे स्थानकाला बाबासाहेबांच्या इतिहासामुळे विशेष महत्त्व लाभले असून या पवित्र भूमीला आंबेडकरी चळवळीत वेगळे स्थान आहे. त्या ऐतिहासिक स्मृती जतन करत नव्या पिढीसमोर बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न या सोहळ्यातून केला जाणार आहे. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, युवक, महिला तसेच बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक डॉ. सुनील गव्हांदे व सौ. पुष्पाताई सुनील गव्हांदे यांनी केले आहे.
“शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा” या बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित हा सोहळा जलंबच्या इतिहासात विशेष ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



