महाराष्ट्रविदर्भ

जनधन खात्यातून पैसे कपातीचा स्टेट बँकेचा अजब फंडा

गोरगरीब खातेदारांच्या संमतीशिवाय विमा योजना सुरु करून जनधन खात्यातून हफ्ते कापण्याचा गंभीर प्रकार.

महेंद्र कराळे हिवरखेड :-
स्टेट बँकेच्या हिवरखेड शाखेत गोरगरीब जनतेच्या अनेक जनधन बँक खात्यांमधून, खातेदारांच्या संमतीशिवाय किंवा पूर्वपरवानगी शिवाय PMJJBY (प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना) अंतर्गत ₹४३६ आणि PMSBY (प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना) अंतर्गत ₹२० इतकी रक्कम कपात केली जात असल्याचा धक्कादायक आरोप ग्राहक आणि जागरूक नागरिकांकडून केला जात असल्याने आणि संबंधित अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने भारतातील सर्वात मोठ्या बँक समूहाच्या विश्वासार्हतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, PMJJBY आणि PMSBY मध्ये नावनोंदणी करण्यासाठी, तसेच ‘ऑटो-डेबिट’ (खात्यातून आपोआप रक्कम वजा होण्याची) सुविधेसाठी खातेदाराची संमती आणि अधिकृत परवानगी असणे आवश्यक असते. परंतु स्टेट बँकेचे मोलमजुरी करणारे ग्राहक रहमान खान बिस्मिल्ला खान यांच्या कुटुंबियांचे 4 जनधन खाते असून विमा योजनेसाठी कोणताही अर्ज न करता चारही खात्यातून विमा योजनेच्या रक्कम कपात करण्यासाठी खात्यात पैसे भरण्यासाठी मेसेज येत असल्यामुळे त्यांना या अफलातून वसुलीची कुणकुण लागली आणि त्यांनी आम्ही विमा योजनेसाठी कोणताही अर्ज केलेला नसून आम्हाला योजना नको असून कृपया आमच्या सर्व खात्यातून कोणतीही कपात करू नये असा पूर्वसूचना अर्ज करूनही जाणीवपूर्वक त्यांच्या खात्यातून कपात केल्याचा आरोप त्यांनी केला असून हा प्रकार फक्त त्यांच्यासोबत घडला नसून तक्रार कर्ते डॉ. वाजीद अली आणि ऍड. धनंजय गावंडे यांनी स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक मनोज चौहान यांच्याशी चर्चा करत असताना प्रबंधकांनी त्यांना धक्कादायक माहिती दिली की जेवढे ही जनधन बँक खाते आहेत त्या सर्वांना ही योजना पूर्वीपासूनच लागू करण्यात आली आहे. त्यावर तक्रारदारांनी ग्राहकांच्या संमतीचा मुद्दा उचलला असता बँक मॅनेजर ने उडवा उडवीची उत्तरे देऊन योजना ग्राहकांसाठी कशी फायद्याची आहे याची गाथा सुरु केली.
त्यामुळे हिवरखेड येथील तक्रारकर्त्यांनी बँकेला अनेक मुद्द्यांबाबत लेखी स्पष्टीकरण मागितले आहे. ज्यामध्ये खालील मुदयांचा समावेश आहे.

खातेदारांच्या संमतीशिवाय PMJJBY आणि PMSBY चे हप्ते कपात करण्यास परवानगी देणारे कोणतेही शासकीय किंवा RBI चे परिपत्रक आपल्या शाखेला प्राप्त झाले आहे का?
जर असे एखादे परिपत्रक अस्तित्वात असेल, तर कृपया जनहितार्थ माहितीसाठी त्याची एक प्रत उपलब्ध करून द्यावी.
जर असे कोणतेही परिपत्रक अस्तित्वात नसेल, तर कृपया स्पष्ट करा की, कोणत्या अधिकाराखाली या कपाती केल्या जात आहेत ?

सोबतच तक्रार कर्त्यांनी इशारा दिला आहे की या अनधिकृत कपाती तात्काळ थांबवल्या जाव्यात आणि योग्य पडताळणी नंतर परवानगी शिवाय कपात केलेली रक्कम संबंधित खातेदारांना परत केली जावी. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर लेखी उत्तर द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.

अनैतिक रित्या कापलेले पैसे परत करणार का?
हा फक्त एका ग्राहकासोबत आणि एकाच शाखेत झालेला प्रकार नसून स्टेट बँकेच्या विविध शाखांमधील हजारो ग्राहकांसोबत हा प्रकार घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे झिरो बॅलन्स मध्ये जनधन खाते उघडायचे आणि गोरगरीब ग्राहकांच्या पूर्वपरवानगीशिवाय वार्षिक मोठी रक्कम अनैतिकरित्या कपात करायची? स्टेट बँकेचा व्याप संपूर्ण भारतात पसरलेला असून विनापरवानगी पूर्ण देशात किती खात्यात ही योजना लागू केल्या गेली असेल आणि किती खात्यातून एकूण किती रक्कम कपात केली असणार??? असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांच्या मनात घर करीत असून देशभरातील ज्या ग्राहकांच्या खात्यातून संमतीशिवाय योजना लागू करून हप्ते कापले त्यांचे सर्वांचे पैसे परत करणार का??आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी गोरगरिबांच्या खात्यामध्ये जाणीवपूर्वक ह्या योजना सुरू केल्या त्यांच्यावर धोखाधडी सह कठोर कारवाई करणार काय याचे स्पष्टीकरण बँकेने देणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया
“आज, देशभरातील सामान्य नागरिकांच्या बँक खात्यांतून निधीची अनधिकृत कपात होणे ही अत्यंत गंभीर चिंतेची बाब आहे. गरीब, शेतकरी, मजूर आणि सामान्य खातेदारांचे म्हणणे किंवा आवाज ऐकूनही न घेता त्यांच्या खात्यांतून रक्कम कपात करणे, हे आर्थिक न्यायाच्या तत्त्वांच्या थेट विरोधात आहे. कोणत्याही जनहितकारी योजनेला आमचा विरोध नाही पण जनतेची संमती आणि पारदर्शकता या गोष्टींना इतर कशापेक्षाही अधिक प्राधान्य मिळणे अत्यावश्यक आहे. या अनधिकृत कपाती नेमक्या कोणत्या आधारावर करण्यात आल्या, याविषयी बँक प्रशासनाने स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या स्पष्ट संमतीशिवाय केलेली कोणतीही कपात कदापि उचित मानली जाऊ शकत नाही….
डॉ. वाजिद अली, हिवरखेड

“खातेदारांच्या स्पष्ट संमतीशिवाय त्यांच्या खात्यांतून PMJJBY आणि PMSBY चे हप्ते (प्रीमियम) वजा करणे, हा त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारा प्रकार आहे. जर संबंधित बँक प्रशासनाने या संदर्भात त्वरित स्पष्टीकरण दिले नाही आणि दोषींवर कारवाई केली नाही, तर जनहितार्थ आंदोलन छेडले जाईल.”
— ॲड. धनंजय गावंडे, हिवरखेड

जनधन बँक खात्यांना प्रधानमंत्री विमा योजना मी रुजू होण्याच्या आधीपासूनच सुरू करण्यात आलेली आहे. संमतीशिवाय हप्ते कापल्या जात असतील तर ग्राहकांनी लेखी तक्रार करावी सदर तक्रारी आम्ही वरिष्ठांना पाठवून रक्कम खातेदाराच्या खात्यात परत जमा करायला लावू… मनोज चौहान , शाखा प्रबंधक भारतीय स्टेट बँक हिवरखेड

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button