कै. निखिलभाऊ खडसे यांच्या स्मृतीदिनी स्मृतीस्थळावर जनसागराचे विनम्र अभिवादन

माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे माजी चेअरमन, कै. निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. चांगदेव शिवार येथील आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी परिसरातील स्मृतीस्थळावर आज सकाळी सामूहिक अभिवादनाचा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला.
कै. निखिलभाऊ खडसे यांनी आपल्या कारकिर्दीत तरुण पिढीसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला होता. सहकार क्षेत्र असो वा सामाजिक कार्य, त्यांनी नेहमीच सामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा आणि प्रेमळ स्वभावाचा गौरव केला. भाऊंच्या आठवणींना उजाळा देताना अनेक जुन्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना गहिवरून आले होते.
याप्रसंगी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, खडसे परिवाराचे सर्व आप्तस्वकीय, मित्रपरिवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शुभचिंतकांनी भाऊंच्या स्मृतीस वंदन केले. आपल्या लाडक्या नेत्याप्रती असलेल्या आदरापोटी संपूर्ण परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने सकाळीच स्मृतीस्थळावर दाखल झाले होते.
यावेळी आलेल्या प्रत्येकाच्या भावनांमध्ये भाऊंबद्दलचे प्रेम आणि आदराचे स्थान दिसून येत होते. “भाऊंचे विचार आणि त्यांनी दाखवलेला मार्ग आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील,” अशा भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केल्या.



