जळगाव जिल्हा शासकीय कर्मचारी पतपेढीतील नोकरभरती वादाच्या भोवऱ्यात; आ. एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत वेधले सरकारचे लक्ष

*जळगाव जिल्हा शासकीय कर्मचारी पतपेढीतील नोकरभरती वादाच्या भोवऱ्यात; आ. एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत वेधले सरकारचे लक्ष* जळगाव जिल्हा शासकीय कर्मचारी सहकारी पतपेढीमध्ये लिपिक व शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर सहकार मंत्री महोदयांनी उत्तर देताना ही भरती प्रक्रिया सध्या न्यायप्रविष्ट असल्याची माहिती सभागृहाला दिली.भरती प्रक्रियेतील अनियमिततेचे आरोपआमदार खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सरकारचे लक्ष वेधले की, पतपेढीने राबवलेल्या भरती प्रक्रियेत जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या अटींचे उल्लंघन करण्यात आले आहे. या प्रक्रियेत मागासवर्गीय अनुशेष नोंदवहीची तपासणी न करणे आणि सभेच्या ठरावात विसंगती असतानाही भरती राबवून वैयक्तिक हितसंबंध जपल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारींबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी जानेवारी २०२६ मध्ये मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली होती.सरकारचे उत्तर आणि न्यायालयीन स्थितीया प्रश्नावर उत्तर देताना सहकार मंत्री महोदयांनी मान्य केले की, भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, सदर भरती प्रक्रियेबाबत सध्या सहकार न्यायालय, जळगाव येथे विवाद (Dispute) दाखल आहे. तसेच, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग यांच्याकडेही पुनरीक्षण अर्ज दाखल असून त्यावर सुनावणीचे कामकाज सुरू आहे.सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने शासन स्तरावर तातडीने कोणती कारवाई करण्यात आली, यावर भाष्य करणे टाळत, न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पुढील पावले उचलली जातील, असे संकेत मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात दिले आहेत. आमदार खडसे यांनी विधान परिषदेत हा विषय लावून धरल्यामुळे पतपेढीतील भरती प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



