राणी गुणवंताबाईंच्या भूमीत बचत गट चळवळीचा जागर हा महिलांच्या उन्नतीचा नवा अध्याय.. आ. सौ. श्वेता महाले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली,,,,,,,, प्रतिनिधी
आरुना दत्तात्रय खंडागळे
महिला दिनानिमित्त करवंड येथे महिला बचत गट सन्मान मेळावा उत्साहात संपन्न..
स्वराज्यासाठी आपल्या कुटुंबासह सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या राणी गुणवंताबाईंच्या पावन भूमीत, जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर महिला बचत गट सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. करवंड महोत्सव कृती समितीच्या वतीने आयोजित या मेळाव्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून चिखली विधानसभेच्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना आमदार श्वेताताई महाले म्हणाल्या, “बचत गट चळवळ ही ग्रामीण महिलांच्या जीवनात खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणणारी ठरली आहे. या चळवळीमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाची वाट गवसली. घरापुरत्या मर्यादित असलेल्या महिला आज व्यवसाय, बचत आणि उद्योगाच्या क्षेत्रात पुढे येत आहेत — हेच या चळवळीचे मोठे यश आहे.”
आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी यावेळी करवंड गावाचा गौरवशाली इतिहास उपस्थितांसमोर उलगडला. छत्रपती शिवाजी महाराजांशी या गावाची जुळलेली नाळ, आणि स्वराज्याच्या ध्येयासाठी राणी गुणवंताबाई व त्यांच्या कुटुंबाने केलेला अतुलनीय त्याग यांचे स्मरण करताना.”राणी गुणवंताबाईंनी स्वराज्यासाठी जे धाडस दाखवले, तोच वारसा आजच्या महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात जोपासायचा आहे. बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणारी प्रत्येक महिला आजच्या काळातील गुणवंताबाईच आहे,” असे प्रेरणादायी उद्गार त्यांनी काढले.
राणी गुणवंताबाईंच्या स्मृती आणि त्यागाला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात येणारा करवंड महोत्सव अधिकाधिक यशस्वी करण्याचे आवाहनही आमदार सौ. श्वेता महाले यांनी यावेळी उपस्थितांना केले.
या मेळाव्यात करवंड महोत्सव समितीच्या वतीने आमदार सौ.श्वेताताई महाले यांच्यासह उपस्थित सर्व महिला बचत गटांच्या सदस्यांचा राणी गुणवंताबाई यांची प्रतिमा व सन्मानचिन्ह देऊन भावपूर्ण गौरव करण्यात आला. गुणवंताबाईंच्याच भूमीत त्यांच्या प्रतिमेसह महिलांचा सन्मान होणे, हे या कार्यक्रमाला एक वेगळी उंची देणारे ठरले.
या कार्यक्रमास बाबाराजे इंगळे, माजी पंचायत समिती सभापती अरविंद देशमुख, प्राचार्य श्री अण्णासाहेब म्हळसणे, माजी पं. स. सदस्या राधाताई कापसे, प्रा. विजय घ्याळ, सचिन गरड, प्रदीप राजे जाधव, विनोदराजे जाधव, रवी इंगळे, अजय रिंढे, अनिल सपकाळ यांच्यासह पस्तीस महिला बचत गटांच्या सदस्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. महिला दिनाच्या निमित्ताने राणी गुणवंताबाईंच्या पवित्र भूमीत रंगलेला हा मेळावा उपस्थित सर्वांसाठी दीर्घकाळ स्मरणात राहील असाच ठरला…



