खानदेशजळगावा जिल्हाधुळेमहाराष्ट्र

धुळ्यातील अभियंत्याची ३.१४ कोटींची ऑनलाईन लूट प्रकरणी आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत सरकारला धरले धारेवर

मुंबई: धुळे येथील एका उच्चशिक्षित अभियंत्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने तब्बल ३ कोटी १४ लाख ११ हजार ८९१ रुपयांना गंडा घातल्याचे खळबळजनक प्रकरण विधानपरिषदेत गाजले. आमदार एकनाथराव खडसे यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला. खडसे यांच्या या प्रश्नामुळे सायबर गुन्हेगारीचा हा मोठा विळखा समोर आला असून, पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सरकारकडून या प्रकरणाची विस्तृत माहिती सभागृहात देण्याची मागणी केली.
आमदार एकनाथराव खडसे यांनी सभागृहात या फसवणुकीच्या घटनेचा संपूर्ण पाढाच वाचला. त्यांनी विचारले की, धुळे शहरातील एका सुशिक्षित अभियंत्याला शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ५ डिसेंबर २०२५ च्या सुमारास कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली, हे सत्य आहे का? विशेष म्हणजे, सायबर गुन्हेगारांनी अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत ही प्रचंड मोठी रक्कम विविध बँक खात्यांद्वारे ट्रान्सफर करून घेतली. या प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आणि फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी शासन नेमकी काय कारवाई करत आहे, असा सवाल खडसे यांनी सरकारला केला.
एकनाथराव खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृहखात्याची धुरा सांभाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची कबुली दिली. त्यांनी सांगितले की, धुळे शहर सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तपासात असे निष्पन्न झाले की, ‘स्नेहनगर’ धुळे येथील तक्रारदाराला अज्ञात इसमांनी शेअर मार्केटच्या लिंकद्वारे जादा मोबदल्याचे आमिष दाखवले. ‘FYERS HNI VIP Growth Hub’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये त्यांना सामील करून ‘FYERS INDIA (HNI)’ नावाचे बनावट अ‍ॅप डाऊनलोड करायला लावले. सुरुवातीला काही नफा मिळवून देऊन विश्वास संपादन केला आणि त्यानंतर RTGS, NEFT व UPI द्वारे तब्बल ३,१४,९९,८९१/- रुपये विविध खात्यात वळवून घेतले.
एका बँक खात्यात ट्रान्सफर झालेली १,१७,००,०००/- रुपयांची रक्कम तातडीने गोठवण्यात आली असून, ती फिर्यादीला परत मिळण्याबाबत न्यायालयाचा आदेश प्राप्त झाला आहे.
काही बँक खातेधारकांनी ‘ऑनलाइन गेम’ खेळल्याने ही रक्कम मिळाल्याचे सांगितले होते, परंतु सायबर पोलिसांनी खात्री केल्यानंतर १,४१,७२९/- रुपये फिर्यादीला ऑनलाईन परत केले आहेत.
या आंतरराज्य टोळीतील ७ आरोपी निष्पन्न झाले असून, ही टोळी सध्या अन्य एका गुन्ह्यात अटकेत आहे. त्यांना लवकरच या गुन्ह्यात ताब्यात घेऊन पुढील तपास केला जाईल.
असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
धुळ्यातील या मोठ्या सायबर फ्रॉड प्रकरणाला वाचा फोडून आमदार एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा आपण जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सिद्ध केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button