मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आघाडीवर उचंदा; मीनल करणवाल यांनी पाहणी…

उचंदा ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध विकासकामे राबवित तालुक्यात आघाडी घेतली असून, या कामांची तपासणी करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांनी आज उचंदा ग्रामपंचायतीला अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाची कार्यशैली, सरकारी योजनांची अंमलबजावणी आणि सुरू असलेल्या विकासकामांची त्यांनी सविस्तर पाहणी केली.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतच्या विविध समित्यांचे अहवाल तपासले. शासनाच्या योजना गावातील पात्र नागरिकांपर्यंत योग्यरीत्या पोहोचत आहेत का, याची तंतोतंत माहिती घेऊन लाभार्थ्यांची पडताळणी केली. ग्रामपंचायत अधिकारी एकनाथ कोळी यांनी ग्रामपंचायतीत राबविल्या जाणाऱ्या विशेष उपक्रमांची माहिती देत गावातील योजनांची वर्तमानस्थिती सादर केली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उचंदा ग्रामपंचायतीने राबविलेल्या प्लास्टिक बंदी उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. “एकच ध्यास ठेवू या – प्लास्टिक पिशवी हटवू या” या घोषवाक्यावर ग्रामपंचायतीने केलेले काम स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर श्रीमती करणवाल यांनी गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्था आणि सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले. गावातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, उपलब्ध सुविधा आणि समस्या जाणून घेतल्या. शिक्षकांना मार्गदर्शक सूचना देत गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या दौऱ्यात लोकनियुक्त सरपंच वंदना दीपक भोलाणे यांनी ग्रामपंचायतीतर्फे श्रीमती मीनल करणवाल यांचा सत्कार केला. यावेळी “मायेची सावली” हे पुस्तक त्यांना भेट देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे, स्वच्छतेबाबत दाखवलेल्या तत्परतेचे आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे कौतुक करून उचंदा ग्रामपंचायत आदर्श ठरत असल्याची नोंद केली.
या भेटीदरम्यान मुक्ताईनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सरपंच वंदना दीपक भोलाणे, ग्रामपंचायत अधिकारी एकनाथ कोळी, दीपक भोलाणे, किरण तायडे, पत्रकार छबीलदास पाटील, योगेश पाटील, मोहम्मद शेख, हर्षल पाटील, रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



