जळगावात भोरगाव लेवा पाटीदार पंचायतचा भव्य सत्कार सोहळा; नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना शुभेच्छांचा वर्षाव

जळगावात भोरगाव लेवा पाटीदार पंचायतचा भव्य सत्कार सोहळा; नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना शुभेच्छांचा वर्षाव
जळगाव । प्रतिनिधी
जळगाव येथे भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे, जळगाव विभागामार्फत नवनिर्वाचित महापौर, नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या सत्काराचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. समाजातील ऐक्य, सन्मान आणि लोकशाही मूल्यांचा गौरव करणारा हा कार्यक्रम उल्लेखनीय ठरला.
या सोहळ्याचे आयोजन भोरगाव लेवा पाटीदार पंचायतच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास पंचायत कुटुंबनायक ललित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा पुष्पगुच्छ व शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित महापौर, नगराध्यक्ष व नगरसेवकांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार सुरेश भोळे (राजुमामा), माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, प्रा. पी. आर. चौधरी, श्री. संजयदादा राणे तसेच श्री. विष्णू भंगाळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात विविध वक्त्यांनी लोकप्रतिनिधींनी पारदर्शक प्रशासन, विकासकामांना गती आणि सर्वसमावेशक धोरण राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली. समाजाच्या पाठबळामुळेच लोकप्रतिनिधींना यश मिळते, ही भावना व्यक्त करत उपस्थितांनी एकात्मतेचा संदेश दिला.
भोरगाव लेवा पाटीदार पंचायतच्या या उपक्रमामुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सन्मानाने कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.



