प्रामाणिक माणसे आहेत.पण दूध देत नाहीत!

मंदिरात,चावडीवर, जेष्ठ नागरिक संघात, भाऊंच्या उद्यानात,गांधी उद्यानात,चहाच्या टपरीवर जो तो म्हणतो, प्रामाणिक राजकारण झाले पाहिजे.दुसरा दुजोरा देतो.हे चोर आहेत.आपल्याला खोटे बोलून लुटतात.
असे म्हणतांना असा आव आणतात कि,आपण दोघे जण प्रामाणिक आहोत. बाकी इतर बदमाष आहेत.
या वाचाळ वीरांना,गपिष्ट लोकांना हे कळत नाही कि प्रत्येक काळात , प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात प्रामाणिक माणसे असतात.कधी काही अनुभवाने कळले कि,हा माणूस प्रामाणिक आहे. पण हेच लोक प्रामाणिक माणसाला साथ देत नाहीत.कारण तो दूध देत नाही.
काही लोक म्हणतात,तुम्ही खूप प्रामाणिक आहात.ऐकायला बरे वाटते.पण हाच माणूस कधीच प्रामाणिक माणसा सोबत उभा राहिला नाही.राहात नाही.याच्या लक्षात आले कि ,हा माणूस प्रामाणिक आहे.तर मग साथ दिली पाहिजे ना!नाही देत.कारण प्रामाणिक माणसापासून याला प्रत्यक्ष फायदा होत नाही.कारण प्रामाणिक माणसाचे दूध निघत नाही.जे याला पाहिजे असते.
रामायणात रामाचे चांगले वर्णन आहे.राम आवडतो.महाभारतात कृष्णाचे वर्णन आहे.कृष्ण आवडतो.पण का?तो रामायणातील राम आणि महाभारतातील कृष्ण मला भेटला पाहिजे.मग माझे जीवन सुखी होईल.
जर असा राम किंवा कृष्ण वाट चुकून याला भेटला तर हा फक्त नमस्कार करणार नाही.त्याच्याकडून काहीतरी मागणारच! माझ्या मुलाला नोकरी लावून दे.माझ्या मुलाचे लग्न करून दे.माझ्या मुलाला मुलगा होऊ दे.माझ्या मुलाची जळगावला बदली करून दे.म्हणजे एवीतेवी मला फायदा मिळवून दे.जर मुलगा, नोकरी वगैरे काहीच नसेल तर म्हणतो,मला तुझ्या सोबत स्वर्गात ने.तू जशी मजा मारतो तशी मला पण मारू दे.तुझ्याकडे कुबेराची तिजोरी आहे.त्यातून माझी बिडी,दारू,सट्टा ची चांगली सोय करून दे.मला सुखात लोळू दे.
मला वाटते माणूस मंदिरात जाऊन देवाची पुजा,आरती, प्रार्थना करतो .ती पण काहींना काही मतलबासाठीच.ज्याच्याकडे बायको ,मुले,नातू,धन संपत्ती असे सर्वच असेल तर तो म्हणतो,माझे पाप कोणाला न कळता धुवून टाक.म्हणजे मी आणखी पाप करायला मोकळा!
अशी कोणतीही अपेक्षा ठेवणाऱ्या माणसाला, बाईला देव कधीच भेटत नाही.जरी त्यांनी दरवर्षी पंढरपूर,बालाजी,काशी , मथुरा,प्रयाग, बद्रीनाथ, केदारनाथ, पशुपतीनाथ ची यात्रा केली तरीही.कारण ही तिर्थक्षेत्र म्हणजे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान नाही.जेथे धान्य,साडी,भांडी आणि पंधराशे फुकट मिळतील.कारण या देवांना निवडणूक लढवायची नसते. तुमच्या मताची गरज नसते.
गांधीजी कडे अनेक लोक आले.त्यांनी गांधीजी कडून काहीतरी मागितले.पण तेच अर्धवट उघडे होते.त्यांनीच सर्वस्वाचा त्याग केला होता.ते काय देणार? म्हणून अनेक लोक त्यांना सोडून गेले होते.काही सज्जन लोकांना मात्र गांधीजी कडून काहीच नको होते.तेच गांधीजी सोबत टिकून राहिले.
देव काहीतरी मिळवण्यासाठी भजणे चुकीचे असते.देव देण्यासाठी भजणे बरोबर असते.जो देतो तोच देव असतो.जो मागतो तो देव ही नसतो आणि भक्त ही नसतो.



