धनुर्विद्येचा जागर – एकलव्य अकादमीच्या वतीने ह.भ.प. वासुदेव महाराज यांचा सत्कार!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय म घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोला.
एकलव्य धनुर्विद्या अकादमीच्या सौजन्याने आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा भव्य समारोप सोहळा नुकताच नांदगाव खंडेश्वर येथे अत्यंत उत्साहात पार पडला. शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि पालकांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाने सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडाविषयक समन्वयाचे एक सुंदर उदाहरण सादर केले. या प्रसंगी ह.भ.प. वासुदेव महल्ले पाटील यांचा सत्कार कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले . श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष आणि समाज प्रबोधनासाठी अखंड झटणारे हे सत्पुरुष धनुर्विद्येच्या मंचावर सन्मानित झाले, ही बाब अत्यंत गौरवास्पद ठरली.
धनुर्विद्येच्या पारंपरिक शैलीत, एक विशिष्ट देखावा सादर करताना वासुदेव पाटील यांना धनुष्यबाणातून हार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी या अनोख्या आणि श्रद्धास्पद क्षणाला भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेली धनुर्विद्येची प्रात्यक्षिके, योगासने, व आत्मरक्षण कौशल्ये ई. नी प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिल सावरकर (अध्यक्ष, अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल),डॉ. दिलीप काळे (गाडगेबाबा विद्यापीठ), बाळकृष्ण आमले (अध्यक्ष, वारकरी महामंडळ – अमरावती महानगर),
यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना ह.भ.प. वासुदेव पाटील महल्ले यांच्या हस्ते गौरवण्यात आला. त्यांच्या हस्ते करण्यात आलेला सत्कार आणि शुभाशिर्वाद खेळाडूंना नवी प्रेरणा देणारा ठरला.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, कार्यक्रमात श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोट यांच्या सामाजिक, धार्मिक, व आरोग्य विषयक उपक्रमांची दखल घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेव महल्ले पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात धार्मिक व समाजउपयोगी कार्ये मोठ्या निष्ठेने पार पाडत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत एकलव्य संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचीत गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरले. अकादमीचे प्रशिक्षक, कार्यकर्ते व आयोजकांनी या भव्य सोहळ्याचे नियोजन यशस्वीपणे पार पाडले.
धनुर्विद्येसारख्या प्राचीन भारतीय शौर्यपरंपरेला नव्या पिढीत पुनर्जीवित करण्याचे कार्य एकलव्य अकादमीने केले आहे. त्यांच्या प्रयत्नांना ह.भ.प. वासुदेव माऊली यांच्यासारख्या आध्यात्मिक मार्गदर्शकांचे आशीर्वाद लाभणे, हीच त्यांच्या यशाची खरी ओळख आहे.



